संजय पाटील यांनी उमेदवारी ५ कोटींना विकली : महादेव पाटीलांचा आरोप
लँडमाफियाचे पैसे घरात पोहोचताच घोषणा; तासगावात मोठी खळबळ

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव नगराध्यक्षपदाची उमेदवारी थेट विक्रीस काढली, असा गंभीर आणि धडाकेबाज आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर केला. ५ कोटी रुपये चिंचणी येथील घरात पोहोचताच उमेदवारी जाहीर झाली, असा त्यांचा दावा असून या आरोपाने तासगावातील राजकारणात अक्षरशः स्फोट घडवला आहे.
महादेव पाटील म्हणाले, “संजय पाटील यांनी वर्षभर पत्नीला उमेदवारी देण्याची गळ घालून आम्हाला अंधारात ठेवले. मात्र शेवटच्या क्षणी लँडमाफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. हे सरळ पैशांचे राजकारण आहे.”
त्यांच्या मते, ५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतरच उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. “लोकशाहीचा उघड उघड सौदा झाला आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली.
महादेव पाटील यांनी संताप व्यक्त करत सांगितले, “संजय पाटील काळ्याकुट्ट मनाचे! विश्वासघाताचा कळस केला आहे. आता त्यांच्या सोबत एक पाऊलही चालणार नाही.”
या आरोपांनंतर तासगावात मोठी खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



