तासगावात आ.रोहित पाटील यांचा वादळी प्रचार; निवडणूक रंगतदार
सकाळपासून रात्रीपर्यंत जनसंपर्क धडाका; वासंती सावंतांच्या प्रचाराची धुरा पाटील यांच्या खांद्यावर

तासगाव :रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पाटील यांनी घेतलेली प्रचाराची आक्रमक भूमिका शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे. सकाळी सूर्योदयापासून रात्री उशिरापर्यंत ते प्रचार, जनसंपर्क आणि बैठकींमध्ये गुंतलेले असून, त्यांच्या वेगवान नियोजन आणि कामकाजाला नागरिकांकडून उत्तम दाद मिळत आहे.
१२ प्रभागातील २४ उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ते घराघरांत जाऊन थेट संपर्क साधत आहेत. काही दिवस प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रचारापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने प्रचारात प्रवेश केला आहे. त्यांच्या सक्रियतेने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली असून नागरिकांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येक प्रभागात दौऱ्यानंतर त्याच प्रभागात संध्याकाळचा मुक्काम करण्याचा त्यांनी अवलंबलेला उपक्रम विशेष ठरत आहे. या पद्धतीमुळे लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जवळून जाणून घेण्यास त्यांना मदत होत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी वासंती सावंत; प्रचाराची धुरा आ.पाटील यांच्या खांद्यावर
तासगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) तर्फे वासंती बाळासो सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आमदार रोहित पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
वासंती सावंत यांची प्रतिमा सुसंस्कृत, कार्यतत्पर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची असली तरी प्रचारयंत्रणेचे भक्कम नेतृत्व आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी रोहित पाटील प्रभावीपणे पार पाडत आहेत.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विरोधकांमध्ये धास्ती?
सकाळपासून रात्रीपर्यंत गतीमान असलेली त्यांची जनसंपर्क मोहीम, नियोजनबद्ध दौरे आणि नागरिकांशी साधलेला थेट संवाद यामुळे तासगावमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढताना दिसत आहे. ते तासगावकरांच्या अडीअडचणी जाणून घेत, ‘स्वप्नातील तासगाव’ घडविण्याचे आश्वासन देत आहेत.

आ.रोहित पाटील यांच्या या वादळी प्रचारामुळे विरोधकांमध्ये धास्तीचे वातावरण तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावाचा मोठा फायदा पक्षाच्या सर्व उमेदवारांना मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
तासगावमध्ये वाढत चाललेला जनसंपर्क, पाटील यांची सक्रिय शैली आणि वासंती सावंत यांच्यासाठी होत असलेला प्रचंड पाठिंबा पाहता, निवडणुकीत उत्सुकतेचे पातळी आणखी वाढली आहे.
तासगावातील राजकीय वातावरणात सध्या एकच चर्चा
“रोहित पाटील मैदानात उतरले म्हणजे प्रचाराला गती आणि उमेदवारांना बळ!”



