
तासगाव:रोखठोक न्यूज नेटवर्क
सावळज (ता. तासगांव) येथील माजी उपसरपंच अनिल थोरात यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी (दि.10) पहाटे निधन झाले. सावळज गावातील सामाजिक,राजकीय, व्यवसायिक व शैक्षणिक क्षेत्रात अनिल थोरात यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे अनिल थोरात सावळज व पंचक्रोशी मध्ये सुपरिचित व्यक्ती होते. 2010 साली सावळज ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली होती. त्यानंतरच्या काळात सावळज गावचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. श्री सावळसिद्ध विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला होता.
द्राक्ष शेती, हॉटेल व्यवसाय तसेच राजकीय क्षेत्रात अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. सोमवारी रात्री छातीत दुखू लागल्याने सावळज येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराचे तीव्र झटके आल्यामुळे अनिल थोरात यांची प्राणज्योत मावळली.
सावळज मधील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनिल थोरात यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. थोरात यांच्या निधनानंतर गावातील व्यावसायिक बंधूंनी आपली दुकाने बंद ठेवली होती. सावळज येथील स्मशानभूमी मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अनिल थोरात यांचा अंत्यसंस्कार विधी करण्यात आला. एक युवा उद्योजकाच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम गुरुवारी (दि.12) सावळज येथे होणार आहे.



