“मैत्री, संघर्ष आणि यशाची कहाणी : अनिल थोरात”

सावळज गावाने मागील वर्षी एक मोठा आधारवड गमावला. गावाचा लाडका पुत्र, संघर्षातून कर्तृत्व गाजवणारा, समाजाशी घट्ट नाळ जोडून जगणारा आणि उद्योजकतेचा नवा मार्ग दाखवणारा युवा उद्योजक स्व. अनिल थोरात आज आपल्या स्मृतींमध्ये जिवंत आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्यांच्या आठवणी, विचार आणि कार्य अजूनही ताजेतवाने आहेत.
अनिलभाऊंचा जीवनप्रवास म्हणजे जिद्दीची कहाणी. एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून साध्या कामातून सुरुवात केलेल्या या तरुणाने मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक नवा उंचाव दिला. शेतकरी म्हणून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले, तर दुसरीकडे मोरया हॉटेलसारख्या उपक्रमातून उद्योजकतेची नवी दिशा निर्माण केली. हा व्यवसाय त्यांच्यासाठी केवळ उपजीविकेचा स्रोत नव्हता, तर परिसरातील लोकांसाठी भेटीगाठींचं ठिकाण, संवादाचा मंच आणि मैत्रीचा दरबार ठरला.
त्यांचे विचारही तितकेच प्रेरणादायी होते. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, शेतीत आधुनिकतेचा स्वीकार झाला पाहिजे आणि स्वतःचे कुटुंब सक्षम झाल्यानंतरच राजकारणात उतरावे – या तत्त्वांवर ते ठाम राहिले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून त्यांनी कार्य करताना पदापेक्षा लोकसेवा श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं. त्यांच्या कार्यशैलीत साधेपणा, आपुलकी आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम होता.
गेल्या वर्षी त्यांच्या अकस्मात निधनाने सावळज आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला. हसतमुख चेहरा, प्रत्येकाशी जिव्हाळ्याने वागण्याची पद्धत आणि नेहमी मदतीला धावून जाण्याची वृत्ती – हे सर्व एका क्षणात हरपलं. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघणं अशक्यच आहे.

आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आठवताना मन भरून येते. त्यांच्या आठवणींचा उजेड, त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याची उब समाजाला पुढील काळातही दिशा देत राहील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, तसेच त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद मिळो, हीच सर्वांची प्रार्थना आहे.
स्व. अनिल थोरात यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
[मिलिंद पोळ -सावळज]



