सावळजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीचे आदेश
आमदार रोहित पाटील आक्रमक ; सावळज प्रा.आरोग्य केंद्राला भेट; आरोग्य विभागाची झाडाझडती

तासगांव : रोखठोक न्यूज
सांगली जिल्ह्यातील सावळज (ता.तासगाव) येथे सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी चव्हाण यांच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आमदार रोहित पाटील यांनी दिले आहेत. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी विशाल कारंडे उपस्थित होते.

येथील सर्पदंश झालेल्या कावेरी प्रेम चव्हाण या नवविवाहितेस वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. मात्र यातील गंभीर बाब म्हणजे त्यावेळी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही आरोग्य अधिकारीच गैरहजर होते. कावेरी चव्हाण यांच्यावर आरोग्य सेविकांनी प्रथमोपचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे असल्याने संतप्त नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनांनी गैरहजर राहिलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहिता कावेरी चव्हाण सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास कामाने कंटाळून झोपली असताना नागाने कावेरीच्या मानेला दंश केला. यावेळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले असताना वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नवविवाहितेचा मृत्यू झाला. या अगोदरही सर्पदंशाने दोन मुलींचा उपचाराविना मृत्यू झाला होता. त्यामुळे वारंवार आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसेच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
आमदार रोहित पाटील यांच्याकडून आरोग्य विभागाची झाडाझडती
सर्पदंश झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा देताना हालगर्जीपणा केल्याने आमदार रोहित पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी दुपारी अचानक सावळज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कारभाराची झाडाझडती घेतली. व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करून कारवाईबाबत अहवाल सादर करावा असा आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांना आमदार पाटील यांनी दिला. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्या निलंबनाचे संकेत मिळत आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुक्काम बाहेरगावी..
नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून वैद्यकीय अधिकारी निवासस्थान उभारले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी यांना मुक्कामी राहणे बंधनकारक आहे. मात्र वैद्यकीय निवासस्थानी न राहता बाहेर गावी राहतात. त्यामुळे दोन्ही वैद्यकीय अधिकारी तात्काळ आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे निवासस्थाने वापराविना पडुन आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.



