सावळजमध्ये भरधाव डंपरचा धुमाकूळ; नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असणाऱ्या सावळजमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण, बाजारपेठेतील सततची वर्दळ आणि शालेय विद्यार्थ्यांची ये-जा यामुळे या गावातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीच गजबज असते. अशा परिस्थितीत धोकादायक वेगाने धावणारे डंपर स्थानिकांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, खडी, सेंड क्रेशर तसेच मुरूम वाहतुकीसाठी वापरले जाणारे डंपर प्रमुख रस्त्यावर इतक्या वेगाने धावतात जणू काही शर्यतच सुरू आहे. या वाहनांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे अपघाताची भीती कायम राहते. शालेय विद्यार्थी, बाजारासाठी आलेल्या महिला, शासकीय कामासाठी गावात येणारे लोक यांच्यावर या वेगवान डंपरची धास्ती बसली आहे.
रहदारीच्या गर्दीच्या ठिकाणीही चालक बेजबाबदारपणे वेग वाढवतात. परिणामी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना “जीव मुठीत घेऊन” प्रवास करावा लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करतात.
दरम्यान, तालुक्यात अपघातांची संख्या वाढत असताना सावळजसह परिसरात धावणाऱ्या डंपरवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.



