तासगाव तालुक्यात “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”
नागरिकांसाठी विविध महसूल सेवा – पारदर्शक व तात्काळ उपलब्ध

तासगाव,रोखठोक न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” तासगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या विशेष अभियानाचा उद्देश नागरिकांना विविध महसूल सेवा पारदर्शकतेने, तात्काळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या काळात सामान्य शेतकरी, नागरिक, घरकुल लाभार्थी तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचे उपक्रम पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
तीन टप्प्यांत अभियान राबविणार
तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सेवा पंधरवडा तीन टप्प्यांत राबविला जाणार आहे :
1. पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर 2025)
पानंद रस्ते विषयक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
गावोगाव शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या पानंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे.यामध्ये गाव नकाशावर असलेले व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले परंतु गाव नकाशावर नसलेल्या रस्त्यांची यादी ग्रामसभेसमोर ठेवण्यात येऊन रस्ते मोकळे करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
2. दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर 2025)
“सर्वांसाठी घरे” या उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल साठी सनद वाटप करण्यात येणार आहे.
3. तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025)
उपविभागीय व तालुका स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील.
यामध्ये “शेतकरी संवाद” आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर थेट चर्चा व उपाययोजना केली जाणार आहे.
सोबतच ज्या पात्र रेशन कार्डधारकांनी आपल्या रेशन कार्ड वर धान्य सुरू होण्यासाठी अर्ज केले आहेत अशा प्रलंबित अर्जांवरती धान्य पुरवठा सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन
तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले की, महसूल विभागाचा हा उपक्रम पूर्णपणे लोकाभिमुख आहे. या सेवा पंधरवड्यात महसूल सेवांचा जलद व पारदर्शक पुरवठा, तक्रारींचे त्वरित निवारण व शासन योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रमुख ध्येय आहे.
त्यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांना आवाहन केले की, या पंधरवड्यातील विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा.



