तासगाव तालुक्यातील प्रश्नांवर तोडगा निघावा : अॅड. स्वप्नील पाटील
गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा : शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन व कार्यकर्त्यांनी एकत्र या

तासगाव,रोखठोक न्यूज
भाजपाचे तासगाव तालुका अध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी तालुक्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा निघावा तसेच शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने पंचायत समिती तासगावचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या वेळी बोलताना अॅड. पाटील म्हणाले की, सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र या योजना प्रत्यक्षात गावपातळीवर पोहोचून गरजू लोकांना त्याचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रशासनाबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही एकत्र येऊन योग्य धोरण आखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तालुक्यातील प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून ती लवकरात लवकर दूर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच येणाऱ्या काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात भरपूर निधी उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग विविध विकासकामांसाठी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी या चर्चेदरम्यान तालुक्यात सध्या राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली. ग्रामविकास, पाणीपुरवठा, महिला-बालकल्याण, शेतकरी कल्याण अशा अनेक योजनांबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या चर्चेमुळे प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व यांच्यातील समन्वय वाढून विकास प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



