तासगावातील बेदाणा उधळण थांबवा अन्यथा आंदोलन
तिसऱ्या आघाडीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन : बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा

तासगाव :प्रतिनिधी
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यात कोट्यवधी रुपयांच्या बेदाण्याची उधळण केली जाते. दांगट समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी. तात्काळ बेदाणा उधळण थांबवावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा तासगाव तालुका तिसरा तिसऱ्या आघाडीच्यावतीने देण्यात आला. याबाबत जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले आहे. तासगाव बाजार समितीचे संचालक आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
शेतकऱ्यांचा कळवळा निवडणुकीपुरताच घेणाऱ्या बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्यामुळेच शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा बेदाणा उधळण करून वर्षाला 15 ते 20 कोटी रुपयांची लूट होत आहे. खुलेआमपणे होणाऱ्या या लुटी बाबत बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दांगट समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात देखील बेदाणा उधळण थांबवण्याबाबत शिफारस केली आहे. मात्र या अहवालाची बाजार समितीकडून अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट राजरोसपणे सुरू आहे.
तासगाव तालुका तिसऱ्या आघाडीच्यावतीने जिल्हा उपनिबंधकांना या लुटीबाबत निवेदन देण्यात आले आहे. बेदाणा सौद्यात सॅम्पल काढतेवेळी पाच किलो पर्यंत बेदाणा उधळला जातो. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. विक्री न झालेल्या बेदाण्याचीही तूट धरली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. शेतीमाल विकताना शेतकऱ्यावर आर्थिक बोजा टाकणे हे न्यायसुसंगत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्य शासनाने शेतीमाल विक्री व्यवस्थेबाबत दांगट समिती नेमली होती. या समितीने शासनास सादर केलेल्या अहवालात बेदाणा हवेत उधळून नुकसान करणे, उधळलेला बेदाणा शेतकऱ्याला परत न करणे, याबाबतच्या बाजार समितीत चाललेल्या गैरकारभाराविषयी शिफारस केली होती. मात्र या समितीच्या शिफारशीबाबत अंमलबजावणी झाली नाही.
त्यामुळे तासगाव, सांगली आणि पंढरपूर बाजार समितीतील बेदाण्याची उधळण तात्काळ थांबवण्यात यावी आणि शेतकऱ्यांची लूट बंद करावी. यासाठी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

तासगाव बाजार समितीचे सत्ताधारी बोलघेवडे : महादेव पाटील
बाजार समितीत चाललेल्या गैरव्यवहाराला बाजार समितीचे सत्ताधारी पदाधिकारी आणि नेते जबाबदार असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक पाटील यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या वेळी शेतकरी हिताच्या घोषणा केल्या. विस्तारित मार्केट सहा महिन्यात सुरू करण्याच्या वल्गना केल्या. प्रत्यक्षात मात्र विस्तारित मार्केटचे कोणतेच काम झाले नाही. शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही. याउलट मर्जीतील व्यापाऱ्यांना सौद्याच्या वेळी वेळा वाढवून देऊन आर्थिक हितसंबंध साधण्याचा उद्योग सत्ताधारी कारभारी आणि नेत्यांच्याकडून होत आहे. तासगाव बाजार समितीचे सत्ताधारी केवळ बोलघेवडे आहेत, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला.



