मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर; प्रारुप यादी प्रसिध्द
20 ऑगस्ट पर्यंत दावे, हरकती मुदत ; उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांचेकडून माहिती

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव- कवठेमंहाकाळ विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भागाचे प्रारुप मतदार यादी तासगाव व कवठेमंकाळ तहसील कार्यालय व सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारुप यादीवर दावे व हरकती ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत स्विकारल्या जातील तसेच, नवीन मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी आज तासगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, भारतीय निवडणूक आयोगाकडील सुधारित वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादी बाबत हरकत असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय येथे विहित वेळेत अर्ज दाखल करावेत असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २८७ तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मिरज यांनी केले आहे.

तसेच, नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म नं.६, नाव कमी करणे किंवा वगळण्यासाठी फॉर्म नं ७ तसेच नावात व पत्त्यामध्ये दुरुस्तीसाठी फॉर्म नं. ८ भरणे बाबत दि. १०, ११ व १७, १८ ऑगस्ट २०२४ रोजी विशेष शिबिराच्या अजून करण्यात आले आहे तरी मतदारांनी आवश्यकतेनुसार फॉर्म नं. ६, ७ व ८ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे भरुन देण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २८७ तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.
सद्यस्थितीत प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादी नुसार, तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात ३ लाख २ हजार ७७६ इतके मतदार आहेत. १८ वर्षां पुढील व्यक्तींचे नाव मतदार यादीत नसेल तर, त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी.असेही आवाहन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.



