साहित्य हे समाज परिवर्तनाचे साधन – प्राचार्य डॉ.राजाराम राठोड
सावळज येथे मराठी वाङ्ममय मंडळ उद्घाटन समारंभ

तासगांव, रोखठोक न्यूज
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजचा तरुण हा वाचनापासून दुरावत आहे. इंटरनेटच्या माध्यमाद्वारा आज अनेक ग्रंथ सहज उपलब्ध होत असल्याने प्रत्यक्षात ग्रंथालयात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी वापरणे पारंपारिक वाटू लागले आहे. परंतु वाचनाने सकस ज्ञान सहज मिळते, शिवाय सामाजिक आत्मभान येत असते, माणूस बहुश्रुत होऊन त्याचे जीवन समृद्ध होत असते. एक सकारात्मक दृष्टी त्याला प्राप्त होत असती, म्हणून ज्ञानेश्वरी,विवेकसिंधू सारख्या प्राचीन ग्रंथांनी तत्कालीन समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणले. म्हणून विचाराने प्रगल्भ झालेले तरुण आपले मत,विचार,भावना व्यक्त करण्यासाठी लेखणी हातात घेतात व त्याच्या हातून नवनिर्मित साहित्य जन्माला येत अशा साहित्यानेच समाज परिवर्तनाची क्रांती घडत असते.असे प्रतिपादन आबासाहेब मराठे आर्ट्स,न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर येथील प्राचार्य डॉ.राजाराम राठोड यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे, श्री.रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज येथे मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या सामंजस्य करार अंतर्गत आयोजित ‘मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभ’ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले की, एकविसावे शतक हे ज्ञानधिष्ठित शतक आहे. आज ज्ञानाला अतिशय महत्त्व आलेले आहे, या ज्ञाना बरोबरच कला,कौशल्याला ही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधारेच अनेक उद्योगपती, लेखक, कलाकार जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून अमाप संपत्ती मिळवत आहेत, याचा आपण विचार जरूर करावा असे मत त्यांनी यावेळी मांडले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे होते.ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, मराठी वाङ्ममय मंडळ हे महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील वृत्ती निर्माण करण्याचे काम करत असते, अनेक वक्तृत्व, निबंध, काव्य वाचन, हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन तसेच भिंतीपत्रक नियतकालिकासाठी लेख असे विविध उपक्रम वर्षभर राबवून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य विकसित करण्याचे काम करत असते. या सर्व प्रयत्नातूनच उद्याच्या समाजात नवे लेखक निर्माण होत असतात, नवा समाज निर्माण करण्याचे काम घडत असते. याचा विद्यार्थ्यांनी सतत लाभ घेतला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख तसेच सर्व सदस्यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ.सोमनाथ पणंदे, ग्रंथालय प्रमुख डॉ.बी.डी.राजगे, डॉ. देबडे सर, डॉ.संदीप कदम, डॉ. संतोष बाबरे, प्रा.साठे सर, प्रा. सचिन ओवाळ, प्रा.अभिजित अंबी, प्रा.सविता रेवडे,प्रा.भोसले मॅडम, प्रा.मच्छगंधाली तारळेकर, तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बळवंत मगदूम यांनी केले. आभार प्रा.सचिन सवने यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.आप्पासाहेब सुतार यांनी केले.



