भयमुक्त मतदार संघाच्या निर्मितीसाठी माझा लढा : रोहित पाटील

तासगांव : रोखठोक न्यूज
निकोप आणि सदृढ लोकशाहीसाठी भयमुक्त वातावरणात निवडणुका होणे गरजेचे असून महिला, सर्वसामान्य जनता व अल्पसंख्यांक घटकांच्या सुरक्षिततेसाठी वाईट प्रवृत्तीच्या विरोधात माझी भूमिका सदैव कडक राहील. मतदार संघातील सामान्यातील सामान्य माणसाची मान महाराष्ट्रामध्ये कुठेही खाली जाणार नाही, ताठ मानेने आपल्या मतदारसंघाचा गौरव होईल असेच वर्तन माझ्याकडून होईल. असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणदी, वायफळे यासह इतर गावातील प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. ठिकठिकाणी रोहित पाटील यांच्या सभांना उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.यावेळी रोहित पाटील यांनी विरोधकांच्या कडून होत असलेल्या दबाव तंत्र आणि गुंडगिरीवर सडकून टीका केली.

विरोधक विकासकामांवरती न बोलता केवळ व्यक्तिगत द्वेषापोटी बोलून मतदारसंघातील वातावरण दूषित करीत आहेत. त्यांच्या गुंड प्रवृत्तीला आता जनता कंटाळली असून मतदार संघातल्या सर्वसामान्य जनतेच्या केसाला जरी धक्का लागल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला. यावेळी ठिकठिकाणी रोहित पाटील यांना समाजातील सर्व स्तरातून उस्फुर्त असा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.



