तासगाव आगारात खासगी गाड्यांचे ‘वॉशिंग’
आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांच्याकडून कर्मचाऱ्यांचा गैरवापर : स्वतःची गाडी लावली धुवायला

तासगाव : प्रतिनिधी
तासगाव आगारात बसेस धुण्याच्या रॅम्पवर खासगी गाड्यांचे ‘वॉशिंग’ होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांच्याकडून कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला जात आहे. पाटील हे स्वतःची खासगी बलेनो गाडी कर्मचाऱ्यांकडून वारंवार धुवून घेत आहेत. आपण आगाराचे मालक असल्याच्या थाटात त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या राबवून घेतले जात आहे. याप्रकरणी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तासगाव आगाराचे आगार प्रमुख दयानंद पाटील यांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यांच्याकडून अनेक चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा आहे. त्यांनी तासगावचा पदभार स्वीकारल्यापासून आगाराच्या नियोजनाचे तीन – तेरा वाजले आहेत. कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक राहिला नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून अनेक तक्रारी येत आहेत.
तासगाव येथील दत्त माळावर आगार आहे. त्याठिकाणी सर्व बसेसचा मेंटेनन्स, इंधन भरणे, वॉशिंग अशी कामे होत असतात. याठिकाणी बसेस व फक्त सरकारी वाहनांचीच कामे होणे अपेक्षित आहे. मात्र आगार प्रमुख दयानंद पाटील यांच्याकडून आगारातील कर्मचाऱ्यांचा अक्षरशः घरगडी असल्यासारखा वापर सुरू आहे.
आगार प्रमुख पाटील यांनी नुकतीच मारुती सुझुकी कंपनीची बलेनो (एम. एच. 51, ए. 1147) ही गाडी खासगी वापरासाठी घेतली आहे. ही गाडी दयानंद जयवंत पाटील म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे. याच गाडीने ते दररोज ये – जा करत असतात. आपल्या कार्यालयात आले की त्यांची गाडी आगारात पार्किंग केलेली असते.
ही गाडी खासगी असतानाही पाटील यांच्याकडून तिचे ‘वॉशिंग’ एसटीच्या ‘सर्व्हिसिंग सेंटर’वर केले जाते. ज्याठिकाणी बसेस धुतल्या जातात त्याठिकाणी बिनदिक्कतपणे आपली गाडी लावून कर्मचाऱ्यांकडून ती धुवून घेतली जाते. एक – दोन दिवसआड ही गाडी धुवून घेण्यात दयानंद पाटील धन्यता मानतात. एसटीचे कर्मचारी म्हणजे जणू घरगडी आहेत, अशा अविर्भावात त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जाते.
रविवारी बसेस धुण्याच्या रॅम्पवर दयानंद पाटील यांची खासगी गाडी धुतली जात असल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला आहे. आपण अधिकारी असल्याचा त्यांच्याकडून गैरवापर केला जात आहे. कर्मचारीही साहेबांची नाराजी नको म्हणून त्यांची खासगी कामे करत आहेत. पण हे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.
याप्रकरणी सांगलीचे कर्तव्यदक्ष विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांचा असला चावटपणा त्यांनी खपवून घेऊ नये. अशा प्रकरणात जर पाठीशी घातले तर त्यांचा फाजीलपणा वाढणार आहे. त्यामुळे याप्रकरणी दयानंद पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.



