बाजार समिती अपहार प्रकरणी आठ दिवसात गुन्हा दाखल होणार
लेखापरीक्षकांचे आश्वासन : मनसेचे अमोल काळे यांचे उपोषण मागे

तासगाव :रोखठोक न्यूज
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहार प्रकरणी तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्या प्रकरणी मनसेचे नेते अमोल काळे यांनी गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. शुक्रवारी विशेषलेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी आठ दिवसात न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतले.

तासगाव बाजार समितीच्या विस्तारित बेदाणा मार्केटच्या बांधकामात अपहर झाला होता. या प्रकरणी चौकशी करून दोषी असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी तासगाव पोलीस ठाण्याला दिला होता. मात्र, चार महिन्यांपासून तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेचे अमोल काळे यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी उपोषण स्थळी अमोल काळे यांची भेट घेतली. चार महिन्यांपासून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याबाबत काळे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. यावेळी, पोलिसांनी लेखापरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्यास केलेला प्रस्ताव निकाली काढल्याचे पत्र दिल्याचे सांगितले. त्यामुळे आठ दिवसात न्यायालयीन प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याची आश्वासन लेखापरीक्षक पैलवान यांनी काळे यांना दिले. त्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतले.
आठ दिवसात गुन्हा न दाखल झाल्यास पुन्हा आंदोलन करणार.
चार महिन्यांपासून अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत होती. या विरोधात उपोषण सुरू केले होते. आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले आहे. आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही. तर, पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन इशारा अमोल काळे यांनी यावेळी दिला.
तासगाव पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केला होता. पोलिसांनी गुन्हा नाकारल्यामुळे न्यायालयात न्यायालयीन गुन्हा दाखल करण्यासाठी आठ दिवसात कार्यवाही करण्यात येईल. ——-
अनिल पैलवान, विशेषलेखा परिक्षक, सांगली.



