पुस्तकांशी मैत्री करून वाचन कला जोपासा : सुनील पवार
पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेची घोषणा ; अमृतवेलच्या माध्यमातून सावळजमध्ये आयोजन

तासगांव,रोखठोक न्यूज नेटवर्क
वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, त्यामुळे आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करा. वाचनामुळे मी घडलो आतापर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले अथवा आजही जे मोठ्या पदावर कार्यरत आहेत हे सर्वजण वाचनामुळेच मोठे झाले आहेत. असे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी केले. सावळज (ता. तासगांव) येथे अमृतवेल ग्रामविकास प्रबोधनी यांच्या वतीने आयोजित पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय सावळज येथे अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनीच्या वतीने पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेची घोषणा व शुभारंभ शनिवारी (दि. 1) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग इन्स्पेक्टर अशोक शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब पाटील, सुनील केडगे,मुख्याध्यापक पी.ए. पोळ उपस्थित होते.

या शुभारंभ प्रसंगी बोलताना सुनील पवार म्हणाले की, प्रत्येकाला शाळेत शिकलेल्या सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण शाळेतील आठवणी मात्र आयुष्यभर स्मरणात राहतात. विद्यार्थी घडवताना त्यांच्यावर शिक्षकांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर सोबत राहते. विद्यार्थी दशे पासूनच वाचनाविषयी तुमच्या मनात गोडी निर्माण झाल्यास तुम्ही हमखास यशस्वी होणार यावर विश्वास असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कमी होऊन द्यायचा नाही. प्रत्येक वेळी निराश न होता प्रयत्न करत रहा. आजकाल मोबाईल मुळे वाचन संस्कृती बिघडत चालली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण आपल्या सगळ्यांची प्रगती तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. आपल्या देशात तक्षशिला, नालंदा अशी मोठमोठी विद्यापीठ अस्तित्वात होती. त्यातील बहुतांश लेखनाचे अस्तित्व नष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाच्या अज्ञानामुळेच बराच काळ आपल्यावर परकीयानी राज्य केले. या पुढचा काळ स्पर्धेचा आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांशीच मैत्री वाढवली पाहिजे. मोबाईल हे आधुनिक तंत्रज्ञान असून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण तसेच या तंत्रज्ञानाचा चांगला तितकाच वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःवर बंधने घातली पाहिजेत. यावेळी सुनील पवार यांनी महात्मा गांधी विद्यालयातील आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, अमृतवेल प्रबोधनी च्या माध्यमातून सुरू केलेल्या पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा ही खूप चांगली संकल्पना आहे. हरवत चाललेली वाचन संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच वाचनाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. वाचन कलेची सुरुवात कशापासून ही करता येते. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनाही अवांतर वाचनाची गरज आहे. वाचाल तर वाचाल हे ब्रीद प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनाशी ठाम करायला हवं. प्रत्येकाने रोज किमान 20 पाने अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकून राहायचे असेल तर तुम्हाला अपार कष्ट व भरपूर वाचन करणे अनिवार्य आहे. आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
रयत शिक्षण संस्थेचे इन्स्पेक्टर अशोक शिंदे म्हणाले, महात्मा गांधी विद्यालयात सुरू केलेला वाचन कला व आकलन स्पर्धा हा उपक्रम संस्थेच्या प्रत्येक शाळेत राबवणार आहे. तसेच या स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व पालकांनाही सहभागी करण्यात येणार आहे. वाचणे हा एक उत्तम छंद आहे. वाचन वेगवेगळया भाषेत करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. मराठीतून वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. ती प्रत्येकाने जपणे आपले कर्तव्य आहे.
अमृतवेल समाजप्रबोधिनीचे धर्मेंद्र पवार यांनी पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेचे स्वरूप सांगितले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, विचारांना चालना देणारी व जिंकण्याची जिद्द निर्माण करणारी ही स्पर्धा एक अभिनव संकल्पना आहे. पुस्तके व्यक्तिमत्व घडवतात मार्ग दिशा दाखवतात म्हणूनच नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा या कृतीशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी तरुण आणि पालकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, तरुणाईला समृद्ध करणारी ही चळवळ पुढे नेण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ए. वाय. पाटील, असलम मुजावर, दीपक पाटील, तुकाराम मगदूम, विजय थोरात, राजेश गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री आलदार सर यांनी केले.
स्पर्धेचे स्वरूप
पुस्तक वाचन वाचन स्पर्धा पुढील गटांमध्ये होणार आहे.
◼️ बाल गट – इ. 1 ली ते 4 थी
◼️ लहान गट – इ. 5 वी. ते 7 वी
◼️ मोठा गट – इ. 8 वी ते 10 वी
◼️ महाविद्यालयीन गट (ज्यु.)- 11 वी – 12 वी
◼️ महाविद्यालयीन गट – प्रथम वर्ष – पदव्युत्तर
◼️ खुलागट
◼️ शाळा गट
◼️ कुटुंब गट ( कुटुंबातील सर्व सदस्य )
प्रत्येक गटासाठी पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पुस्तके भेट स्वरूपात देत दिले जाईल.



