तासगाव तालुक्यात अवैध धंदे फोफावले: मनसेची तक्रार, पोलिसांना निवेदन, कारवाईची मागणी

तासगाव:प्रतिनिधी
तासगाव तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या मटका, गांजा, कसिनो, गुटखा, दारू यांसारख्या अवैध धंद्यांवर कारवाई करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहे. यामध्ये मटका, गुटखा, कसिनो, गांजा, दारू असे अनेक अवैध धंदे बिनधास्तपणे सुरु आहेत. यावर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
गुटख्याची तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या सर्व तस्करीचे जाळे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तासगाव तालुक्यामध्ये गुटखा हा कर्नाटक राज्यातील कागवाड, अथणी, उगार, कुडची या गावातून येतो. या गुटख्या मुळे तालुक्यातील व शहरातील युवा वर्ग हा मावा व गुटखा या व्यसनाच्या आहारी गेला आहे व तालुक्यातील कर्करोगाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तासगाव तालुक्यामध्ये संबंधित गुटखा तस्कर विमल, आर यम डी, पवन बाबू, रजनी गंधा व रत्ना सुगंधी तंबाखू याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

तासगाव शहरात व तालुक्यामध्ये अवैधरित्या मटका व्यवसाय शिगेला गेला आहे, अनेक तरुण या खेळाच्या आहारी गेले आहेत. कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या नादात तासगाव व ग्रामीण भागातील नागरिक या मटक्याच्या नादी लागून कुटुंब उद्वस्थ करून घेत आहेत.
तासगाव शहर व ग्रामीण भागात ऑनलाईन कसिनो गेम चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कमी वेळेत श्रीमंत होण्याच्या आशेने कसिनो गेम वर मोठ्या प्रमाणात पैसे लाऊन अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. दररोज ऑनलाईन लॉटरी च्या नावाखाली तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची लूट होत आहे. तालुक्यातील अनेक तरुण या कसिनो लॉटरीच्या चक्रव्युहात अडकून आपल्या जवळचे लाखो रुपये गमवून बसले आहेत. तरीही आपल्याकडून कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

या सर्व अवैध्य धंद्याना तासगांव पोलीस प्रशासन बळ देत असल्याचे दिसून येत आहे. तरी या सर्व प्रकार बाबत आपण स्वतः लक्ष घालून या सर्व अवैध धंदे करणाऱ्यांवर येत्या ५ ते ७ दिवसात कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



