# सावळज आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांवर कारवाई ; डाॅ. नंदिनी मालेदार बडतर्फ ; डाॅ. आरती शेळके निलंबित विभागीय चौकशी होणार – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

सावळज आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांवर कारवाई ; डाॅ. नंदिनी मालेदार बडतर्फ ; डाॅ. आरती शेळके निलंबित विभागीय चौकशी होणार

जिल्हा आरोग्य अधिका-यांचे आदेश ; सर्पदंश प्रकरणातील गैरहजेरी अंगलट

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

सर्पदंशानंतर उपचारावेळी झालेल्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या सावळज (ता. तासगाव) येथील कावेरी चव्हाण यांचे प्रकरण सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती शेळके यांचे निलंबन करुन विभागीय चौकशी करण्याचा अहवाल उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना पाठविण्यात येणार आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी मालेदार यांना मात्र सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली. सदर प्रकरणाबाबतचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विशाल कारंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांचेकडे सादर केला. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या सावळज येथील नवविवाहिता कावेरी चव्हाण सोमवारी घरी झोपल्या असताना नागाने दंश केला होता. त्यांना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, तेंव्हा आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावा लागला.

हा धक्कादायक प्रकार समजताच आमदार रोहित पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बुधवारी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत कारभाराची झाडाझडती घेतली. संबंधित प्रकरणात दोषी वैद्यकीय अधिकारी व इतरांवर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करा, असे निर्देश तालुका आरोग्य अधिकारी यांना आमदार रोहित पाटील यांनी दिले होते.
आमदार रोहित पाटील यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांचेकडे सादर केलेला होता. गुरुवारी सायंकाळी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी सदर प्रकरणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांच्यावरील कारवाईचे आदेश दिले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!