विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे भरा :प्रशांत केदार
रास्ता रोको-वृक्षारोपण व श्राद्धविधी घालणार.

तासगाव : प्रतिनिधी
विटा-तासगाव-म्हैशाळ रस्त्यावर खड्ड्याचे विराट साम्राज्य विस्तारले आहे.खड्डयामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तेंव्हा विटा-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावेत.अन्यथा रास्ता रोको करून खड्ड्यात वृक्षारोपण व श्राद्ध विधी करण्याचा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांना दिला आहे.
अभियंता महाजन यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे की, विटा-तासगाव-म्हैसाळ हा राष्ट्रीय महामार्ग क्रं-160 हा वाहतुकीस अरुंद आहे. 66.675 किमी लांबीच्या अरुंद रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. विटा-तासगाव-म्हैसाळ हा रस्ता सांगली,मिरजसह कर्नाटक राज्याला जोडतो..कराड-नागज, कराड-जत, रत्नागिरी-नागपूर रस्त्यांना जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे.त्यामुळे विटा-म्हैसाळ रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. लहान-मोठी,अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील वर्षी 2,93,04,727 रु खर्ची टाकण्यात आले आहेत. मागील वर्षी त्या पैशात जुजबी स्वरूपाचे खड्डे भरण्यात आले.परिणामी यंदाच्या अवकाळी पावसाने रस्त्यावर पुन्हा खड्डे पडलेत.खड्ड्यातून वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यामुळे यापूर्वी अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत.याकडे गांभीर्याने पहावे.
तात्काळ विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे भरावेत.अन्यथा दलित महासंघ (मोहिते गट) वतीने रास्ता रोको करून खड्ड्यात वृक्षारोपण करून श्राद्ध विधी घालण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला आहे.निवेदनावर प्रमिला गावडे,नितीन जाधव,शोभाताई सालपे,श्रुष्टी कांबळे, विजया माळी,सचिन पाटील,पिंटू केंगार सह्या आहेत.



