हत्तीगवत व मका पिकात लपवून गांजाची लागवड; आरोपी जेरबंद
तासगाव तालुक्यात मोठी कारवाई ;१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत १५० किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. अजय नारायण चव्हाण (वय ३५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या शेतात मका आणि हत्तीगवत पिकामध्ये गांजाची लागवड केली होती. छाप्यात शेतातून ३ ते ७ फूट उंचीची पाने, फुले आणि बोंडे असलेली गांजाची झाडे आढळून आली. त्यांचे वजन १४८ किलो इतके होते, तर अर्धवट वाळवलेल्या गांजाचे १.३ किलो प्रमाणात जप्त करण्यात आले.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पो. उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सहभागी झाले होते.
आरोपीविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५२/२०२५ भादंवि कलम ८(क)(ब), २०(अ)(ब)(i)(ii)(c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे.
दरम्यान, नशामुक्ती अभियानांतर्गत सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले असून, नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा अंमली पदार्थांबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, अशी आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.



