कवठेमहांकाळ मध्ये डॉक्टरांच्या घरी बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; ‘स्पेशल 26’ची आठवण!

कवठेमहांकाळ : रोखठोक न्यूज
कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. नामांकित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला आणि कोट्यवधींचे सोने व रोकड लंपास केले. या घटनेमुळे प्रसिद्ध हिंदी चित्रपट स्पेशल 26ची आठवण शहरवासीयांना झाली आहे.
झुरेवाडी रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल शेजारी असलेल्या म्हेत्रे यांच्या घरी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ही घटना घडली. तीन पुरुष आणि एक महिलेच्या टोळीने “आयकर छापा” टाकल्याचे भासवत घराची झडती घेतली. यादरम्यान घरातील सोन्याचे दागिने व रोकड त्यांच्या हाती लागले आणि काही क्षणांतच ते सर्व लंपास करण्यात आले. अंदाजे दोन कोटी रुपयांच्या ऐवजावर या टोळीने हात साफ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
घटनेनंतर डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा घटनास्थळी दाखल झाली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
स्पेशल 26 – पडद्यावरचं कथानक, प्रत्यक्षातली पुनरावृत्ती!
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पेशल 26 या चित्रपटात अक्षयकुमारसह काही कलाकारांनी बनावट आयकर अधिकारी बनून मुंबईतील मोठमोठ्या व्यापाऱ्यांवर धाड घालण्याची कथा दाखवली होती. पोलिस आणि सरकारलाही पुरावे न सापडता हे गुन्हेगार हुशारीने लाखो रुपयांचा माल लंपास करताना दाखवले होते.
कवठेमहांकाळमधील ही घटना अगदी त्या चित्रपटाची कार्बन कॉपी वाटते. बनावट अधिकाऱ्यांचा वेष, छाप्याच्या नावाखाली झडती, आणि ऐवज गायब — हा थरार पडद्यावरून थेट वास्तवात उतरल्यासारखा आहे.
सिनेमातून प्रेरणा घेणारे गुन्हे
गेल्या काही वर्षांत अनेक गुन्हेगारी टोळ्यांनी चित्रपटांमधून “आयडिया” घेऊन गुन्हे केलेले आढळले आहे. दबंगनंतर बनावट पोलीस, ड्रिश्यमनंतर पुरावे पुसण्याची नक्कल, आणि आता स्पेशल 26नंतर बनावट आयकर अधिकारी अशा घटना घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की अशा चित्रपटातील शक्कल गुन्हेगारांना जशीच्या तशी वापरण्यास प्रवृत्त करते. पण वास्तवात अशा गुन्ह्यांमुळे पीडितांचे मोठे नुकसान होते, आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. यामुळेच या घटनेला साधा दरोडा न म्हणता चित्रपटातून प्रेरित गुन्हा म्हणणं चुकीचं ठरणार नाही.



