सावळज ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय : गावात डॉल्बीला बंदी

तासगाव,रोखठोक न्यूज
आधुनिकतेच्या नादात वाढत चाललेला डॉल्बीचा त्रास थांबवण्यासाठी सावळज ग्रामसभेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत गावात डॉल्बी वापरावर बंदी घालण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
गेल्या काही वर्षांत गावातील धार्मिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर प्रचंड वाढला होता. त्याच्या तीव्र आवाजामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत होते, तर वृद्धांना हृदयविकारासारख्या आजारांचा त्रास वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामसभेत निदर्शनास आणून देण्यात आले.

यावर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते ठराव क्र. ७(७) मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार, सावळज गावातील कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक वा इतर कार्यक्रमात डॉल्बीचा वापर होणार नाही. ग्रामपंचायतीने हा निर्णय शासनाकडेही प्रस्ताव स्वरूपात पाठविण्याचे ठरविले आहे.
गावाच्या आरोग्य आणि सामाजिक शांततेच्या दृष्टीने घेतलेला हा ठराव ऐतिहासिक ठरत असून, ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले आहे. ग्रामपंचायतीकडून पुढील काळात या निर्णयाबाबत लोकजागृती करण्यात येणार असून, गावकरी व युवकांनी यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून
करण्यात आले आहे.



