तासगावातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे प्रक्रिया सुरू : तहसिलदार अतुल पाटोळे यांचे आदेश

तासगाव :रोखठोक न्यूज
तालुक्यातील अनेक गावांमध्ये 26 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे फळपिके व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसिलदार अतुल पाटोळे यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे,मणेराजुरी, विसापूर, मांजर्डे, येळावी, सावळज व वायफळे मंडळातील शेतकऱ्यांची पिके 33 टक्क्यांहून अधिक प्रमाणात बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने गावनिहाय पंचनामे करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके संयुक्त स्वरूपात पंचनामे करून 5 ऑक्टोबर 2025 अखेर तहसिल कार्यालयात अहवाल सादर करणार आहेत.
पंचनामे करण्यासाठी नियुक्त पथके
सावळज, विसापूर, मणेराजुरी, येळावी व वायफळे या मंडळातील गावांमध्ये विशेष पथक तयार करण्यात आले असून, प्रत्येक गावासाठी संबंधीत ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंचनाम्यांचे पर्यवेक्षण मंडळ अधिकारी तासगाव व कृषी पर्यवेक्षक यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
सावळज गावासाठी मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विसापूर, मणेराजुरी व येळावी, मांजर्डे मंडळांमध्ये देखील गावनिहाय अधिकारी निश्चित केले गेले आहेत.
अहवाल सादर करण्याचे निर्देश
सर्व पंचनामे पर्यवेक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करून, गोषवार अहवाल तयार करून संबंधीत मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक नोंद होऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही वेगाने होऊ शकेल.
तहसिलदारांचे आवाहन
तहसिलदार अतुल पाटोळे यांनी आदेशात नमूद केले आहे की, “अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी तातडीने पंचनामे करणे ही अत्यावश्यक बाब आहे. महसूल, कृषी व ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी यांनी समन्वय साधून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.”
या आदेशामुळे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शासनाकडून मदतीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



