उद्या तासगाव तहसीलसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश; आ. रोहित पाटील यांचे लाक्षणिक उपोषण

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. शासनाकडून अजूनही ठोस मदत न मिळाल्यामुळे उद्या (१ ऑक्टोबर २०२५) तासगाव तहसील कार्यालयासमोर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे.
प्रमुख मागण्या
अतिवृष्टी झालेल्या सर्व भागात सरसकट पंचनामे.
शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी.
ओला दुष्काळ जाहीर करणे.
नुकसानभरपाईची अनुदान रक्कम वाढवून देणे.
शेतकऱ्यांची बँक वसुली व कर वसुली थांबवणे.
निराधार पेन्शन त्वरित देणे.
थांबवलेली रोजगार हमी योजना सुरु करणे.
आजचा शेतकरी संकटाच्या गर्तेत आहे, पण शासन अजूनही गाढ झोपेत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ उत्पादनाचा नाही, तर अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्याचे उपोषण ही फक्त मागण्यांची यादी नाही, तर शासनाला दिलेला स्पष्ट इशारा आहे.
उद्याचे हे उपोषण तासगाव तहसीलसमोर शेतकऱ्यांच्या आक्रोशाला वाचा फोडणार आहे. शासनाने याकडे केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न म्हणून गांभीर्याने दखल घ्यायला हवी. अन्यथा ही ठिणगी मोठ्या आंदोलनाचे रूप घेईल, यात शंका नाही.



