शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू : प्रभाकर पाटील यांचा इशारा
शासनाने नियमावर न अडकता सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

तासगाव,रोखठोक न्यूज
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे तासगाव आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील द्राक्षासह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या भीषण परिस्थितीत शासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असून, शेतकऱ्यांसमोर नियमांची पुस्तक वाचली जात आहेत, अशी टीका युवा नेते प्रभाकर पाटील यांनी केली. त्यांनी प्रशासनाला थेट इशारा देत, “शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता नियमावर बोट न ठेवता सर्व नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.ते सावळज (ता. तासगाव)येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
सावळज येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे अनेक द्राक्षबागा पूर्णपणे फेल झाल्या असून शेतकऱ्यांचे आर्थिक चक्रच कोलमडले आहे. शासनाने याबाबत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (NRC) च्या शास्त्रज्ञांची समिती गठीत केली असली, तरी तिचा अहवाल येईपर्यंत थांबणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन सर्व द्राक्षबागा व इतर पिकांचे पंचनामे त्वरीत करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी माजी खासदार संजय काका पाटील हे तासगाव येथे “सरसकट पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर पाटील व संजय काका पाटील यांनी तासगाव व कवठेमंकाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला असून, अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सावळज मंडलाधिकारी रवीकरण वेदपाठक व ग्राममहसूल अधिकारी अजित बनसोडे यांच्याकडे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
प्रभाकर पाटील पुढे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या अस्मानी संकटाचा गांभीर्याने विचार करून तातडीने कर्जमाफी जाहीर करावी. अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
या आढावा बैठकीस सावळज ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बिरणे, सोसायटी चेअरमन बंडू पाटील, विनायक पवार, संदीप माळी, शिवाजी पाटील, प्रदीप माळी, सचिन देसाई, खंडू ओवाळे, सचिन भोसले, तानाजी निकम, आमित झांबरे, सुधाकर पोळ, विनेश पोळ, किशोर देसाई, अमोल लिगाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये; तातडीने कर्जमाफी व सरसकट पंचनामे जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!” प्रभाकर पाटील यांचा इशारा



