“तासगाव नगरपालिका ; द गेम ऑफ चेअर्स!”
अफवांच्या खेळीत राजकारण गजबजलं; तिरंगी रणधुमाळीची चाहूल

तासगावमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय वारे जोरात
“आबा-काका” समेटाच्या अफवांनी वातावरण तापले!
तासगाव, मिलिंद पोळ
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात हलकल्लोळ माजला आहे. पारंपरिक विरोधक असणारे माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात आपापली संघटनात्मक बांधणी वेगाने सुरू ठेवली असून, समेटाच्या या चर्चांना केवळ तर्कवितर्कांचा रंग आहे.
संजय पाटील यांनी भाजपपासून विभक्त होत “विकासाच्या माध्यमातून पुढील सर्व निवडणुका लढवणार” अशी भूमिका स्पष्ट केली आहे, तर आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत निवडणुका लढवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. दुसरीकडे, भाजप-महायुतीनेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अलीकडील दौऱ्यानंतर तासगावात नव्याने मोर्चेबांधणी केली असून, संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.
10 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू असली, तरी चार दिवस उलटून एकही अर्ज दाखल न झाल्याने शहरात राजकीय खळबळ माजली आहे. मात्र, बहुतांश इच्छुकांनी ऑनलाइन प्रक्रियेसाठी तयारी सुरू केल्याने शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी-आघाडी, भाजप-महायुती आणि माजी खासदारांची “विकास आघाडी” यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. “आबा-काका” समेटाच्या अफवांमागे काहींचा राजकीय स्वार्थ असल्याची कुजबुज असून, दोन्ही गटांतील कार्यकर्ते मात्र स्वतंत्र रणनिती आखत आहेत.

नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने उमेदवारीच्या वाटपात गटांतील पेच वाढला आहे. अर्ज दाखल, छाननी आणि माघारीनंतरच खरी लढत रंगणार असून, तासगावची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे, तर नेतृत्वाच्या ताकदीची कसोटी ठरणार आहे.



