तासगावात चौथ्या दिवशीही अर्जशून्य सन्नाटा!
तासगावात निवडणुकीची चाहूल : शांततेआड राजकीय वादळाची कुजबुज?

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज, गुरुवारी चौथ्या दिवशीसुद्धा एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सलग चार दिवसांनीही एकही अर्ज न आल्याने तासगावात राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच तापली आहे. निवडणूक विभागाने ही अधिकृत माहिती दिली आहे.
युती आणि आघाड्यांच्या चर्चेमुळे कार्यकर्ते गोंधळात असले तरी दोन्ही प्रस्थापित नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. मात्र, आज तासगाव शहरातील एका कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांनी एकत्र हजेरी लावल्याने नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रितपणे रणांगणात उतरणार असल्याचे संकेत या उपस्थितीतून स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे तासगावची निवडणूक आता केवळ तिरंगी नव्हे तर अत्यंत रंगतदार आणि ऐतिहासिक ठरणार, अशी चर्चा राजकीय गल्लीपासून चहाच्या टपरीपर्यंत जोरात सुरू आहे.
तासगावात निवडणुकीची चाहूल : शांततेआड राजकीय वादळाची कुजबुज!
नगरपालिका निवडणुकीची जोरदार चाहूल लागल्याने तासगावात राजकीय तापमान हळूहळू वाढू लागले आहे. माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याने गटांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सध्या शहरात शांतता भासत असली, तरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती, आघाड्या आणि सेटलमेंटचे सर्व समीकरणे उघड होणार असल्याची चर्चांना जोर धरला आहे. आगामी काही दिवसांत तासगावच्या राजकारणाचे खरे रंग पाहायला मिळतील, अशी उत्सुकता मतदारांमध्ये वाढली आहे.



