राजेंद्र चव्हाण यांची गणेश नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
सामाजिक कार्य, प्रामाणिकपणा व सहकार भावनेचा सन्मान

तासगाव,रोखठोक न्यूज
गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बेदाणा कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सदाशिव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी रंजना बारहाते यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. सहकार क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या चव्हाण यांच्या निवडीचे शहरात स्वागत होत असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन सुरू आहे.
बेदाणा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना चव्हाण यांनी बेदाणा कामगारांच्या हितासाठी विमा योजना, वारणी वाढ, तसेच कामगार कल्याणाच्या विविध उपक्रमांतून लक्षणीय कामगिरी बजावली होती. सामाजिक जाणीव ठेवत त्यांनी स्वराज्य फाउंडेशन या क्रीडा संस्थेच्या माध्यमातून शहरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना राजेंद्र चव्हाण म्हणाले, “संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. सदस्यांच्या विश्वासाला पात्र राहणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
चव्हाण यांच्या निवडीबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळी, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सहकार क्षेत्रातील एक प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व्यक्ती संचालक मंडळात आल्याने संस्थेच्या पुढील प्रगतीला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



