माजी खासदार संजय पाटील करणार राजकीय पुनरागमन
शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यातून भूमिका जाहीर होणार

तासगाव : रोखठोक न्यूज
सांगलीच्या राजकारणात बुलंद आवाज असलेले माजी खासदार संजय पाटील आता पुन्हा राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ अज्ञातवास घेतलेल्या पाटील यांनी “ॲक्टिव मोड”मध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातून ते आपल्या आगामी राजकीय भूमिकेबाबत दिशा ठरवणार असून हा मेळावा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ‘रिचार्ज पॉईंट’ ठरणार आहे.
“सत्तेला चिटकून बसणे हा माझा मार्ग नाही. आपली लढाई आपणालाच लढायची आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला आहे. त्यांच्या या विधानातून अनेक अर्थ कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांकडून काढले जात आहेत. संजय पाटील यांच्या आगामी भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात असले तरी शनिवारी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतरच सगळ्या भूमिका स्पष्ट होतील.
आगामी तासगाव नगरपालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आलेली मरगळ झटकून नव्याने कामाला लागण्यासाठी पाटील यांची यंत्रणा सज्ज झाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गेल्या काही महिन्यांत माजी खासदार संजय पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील विविध कार्यक्रमांमधून तसेच डिजिटल व सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाभर त्यांचे स्वतःचे वैयक्तिक राजकीय नेटवर्क असून या नेटवर्कची भूमिका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
दरम्यान, पाटील यांनी तासगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदे आगोदर भाजपनेही नव्या कार्यकारिणीच्या निवडीचा कार्यक्रम घेतला. यामुळे पाटील यांची भूमिका काय असणार याकडे भाजपकडूनही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील भाजप नेते सावध प्रतिक्रिया देत असले तरी संजय पाटील यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.



