तासगांवात “विकासासाठी भाजपला साथ द्या” ना. चंद्रकांत पाटील
पालिका आपल्या हातात आली तर आठवड्यातून एक दिवस तासगावात

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगावकरांच्या राजकारणातील तापलेल्या वातावरणात भाजपच्या प्रचारसभेत मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी विकासाधारित नेतृत्वाची हमी देत मतदारांना थेट साद घातली. “तासगावात पैशाचे राजकारण वाढत आहे; मला हा खेळ संपवून विकासावर आधारित नवी राजकीय दिशा द्यायची आहे. मी कमी बोलतो, जास्त काम करतो. पालिकेवर भाजपची सत्ता आली तर मी तासगावचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेत आठवड्यातून एक दिवस येथे थेट जनतेत बसणार,” असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत पाटील यांनी नगरपरिषदेवर भाजपचे पॅनेल निवडून देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचे सांगत “विकासनिधीसाठी योग्य ‘कनेक्ट’ आवश्यक आहे, आणि तो फक्त भाजपकडूनच मिळू शकतो,” असे त्यांनी अधोरेखित केले.
नरेंद्र मोदी यांच्या २०४७ महासत्ता भारताच्या स्वप्नाचा उल्लेख करत पाटील म्हणाले, “राज्यात तिजोरीची चावी आमच्याकडे आहे. विरोधकांना सत्ता दिली तर तासगावचा विकास खुंटेल. त्यामुळे मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा.”
विरोधकांच्या लिलावशैलीतील उमेदवारी प्रक्रिया, पैशांचा अतिरेक आणि गुंडगिरीवरही त्यांनी टीका केली. “उमेदवारी विकत घेणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा. सामान्य, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना साथ द्या,” असे ते म्हणाले.
भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनीही या सभेत बोलत तासगावात “४० वर्षांनी सुरू होणारे युवा पर्व” असा उल्लेख करत भाजपच्या पॅनेलला सर्वसमावेशकता देण्यात आल्याचे सांगितले. “रिंग रोडसह अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी तासगावला आता ठोस बदलाची आवश्यकता आहे,” असे त्यांनी मत व्यक्त केले.

या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या चव्हाण यांच्यासह अनिल लोंढे, शेखर इनामदार, उदय भोसले, दिनकर धाबुगडे,प्रशांत कुलकर्णी, आरपीआयचे प्रवीण धेंडे,सागर चव्हाण तसेच सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



