मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संदीप गिड्डेंना फटकारले : मुख्यमंत्र्यांच्या नावाचे राजकारण करू नका
तर पालकमंत्र्यांनी थेट माझ्यावर पोलीस केस करावी.. गिड्डेंचे पालकमंत्र्यांना आव्हान

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारदरम्यान भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी केलेल्या विधानांमुळे मोठी राजकीय खळबळ माजली आहे. गिड्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठींबा दर्शविल्याचा दावा केला होता. त्यांनी यासाठी एक मेसेजही दाखवला होता.
या दाव्यानंतर शुक्रवारी दुपारी तासगावात झालेल्या सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकृत व्हिडिओ सादर केला. या व्हिडिओमध्ये तासगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या चव्हाण यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गिड्डे यांनी केलेल्या दाव्यांमध्ये आणि अधिकृत भूमिकेत स्पष्ट विसंगती असल्याचे समोर आले.
गिड्डे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश पाळले नाहीत, असा उल्लेख केला होता. मात्र दुपारच्या व्हिडिओ सादरीकरणानंतर परिस्थितीत महत्त्वाचा बदल झाल्याचे दिसले.या घडामोडींनंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात संदीप गिड्डे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
तर पालकमंत्र्यांनी थेट माझ्यावर पोलीस केस करावी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना संदीप गिड्डे म्हणाले की, तासगावात स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या गटबाजीवर भाष्य करणे आवश्यक होते. मी दिलेला मुख्यमंत्र्यांचा दाखला जर खोटा असेल, तर पालकमंत्र्यांनी थेट माझ्यावर पोलीस केस करावी. एआय व्हिडिओ दाखवून मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न होऊ नये. मुख्यमंत्र्यांसोबत झालेले संभाषण गोपनीय असल्याने मी ते उघड करत नाही, मात्र पालकमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडून खात्री करून घ्यावी. मी केलेल्या विधानाला पालकमंत्र्यांकडून थेट उत्तर दिले जात आहे, हीच माझ्या पत्रकार परिषदेची पोहोच असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत भाजपच्या वरिष्ठांचा आदेश पाळणार असल्याचे मी स्पष्ट केले होते, पण हेच चंद्रकांत पाटील यांनी पाहिले नाही, असेही गिड्डे यांनी नमूद केले.



