तासगाव नगरपालिकेसाठी काँग्रेसचा आ. रोहित पाटील गटाला खुला पाठिंबा
शहारात जमिनी लुटण्याचा उद्योग : महादेव पाटील यांचा माजी खासदार संजय पाटील गटावर आरोपांची मालिका

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगावातील बायपास, देवस्थान आणि लिटीगेशनमधील जमिनी ‘कवडीमोल भावाने बळकावून कोट्यवधींना विकण्याचा’ मोठा रॅकेट रचले गेले असून या संपूर्ण प्रकरणामागे माजी खासदार संजय पाटील आणि त्यांची जमिनी लुटणारी टोळी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार विजया पाटील यांच्या पती बाबासाहेब पाटील यांच्यावरही मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावण्याचा थेट आरोप त्यांनी केला. “बायपासशेजारचे तब्बल १६ सातबारे बाबासाहेब पाटील यांच्या नावावर आहेत,” असा दावा त्यांनी केला.
महादेव पाटील म्हणाले, “तासगाव बायपासचे काम का रखडले याचा तपास घेतला तर खरे चित्र बाहेर येते. या बायपाससाठी शासनाचे पैसे आधीच उपलब्ध होते, परंतु ही टोळी शेतकऱ्यांना पैसे मिळू देत नाही. मोक्याच्या जमिनी हडपून नंतर त्या शासनालाच कोट्यवधींना विकण्याचा काळ्याकुट्ट उद्योग या गटाने सुरू केला आहे.” त्यांनी सिद्धेश्वर, हटकेश्वर, पिर देवस्थानांच्या जमिनीही या टोळीने घशात घातल्याचा आरोप केला.
पालिकेतील भ्रष्टाचारावरही त्यांनी थेट बोट ठेवले. भुयारी गटार योजना कोट्यवधी खर्च करूनही सपशेल अपयशी ठरल्याचे सांगताना ते म्हणाले, “या योजनेचा मोठा घोटाळा आहे. बाबासाहेब पाटील नगरवाचनालयाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. एका महिला कामगाराचा पगार शासनाकडून येत असूनही दोन वर्षे दिला नाही. तिला कामावरून काढण्यासाठी कट रचला गेला.”
१९९५ मध्ये नगरसेवक असताना वाचनालयाला २५ हजारांचा निधी पालिकेतून देत असल्याचा उल्लेख करून महादेव पाटील म्हणाले, “आज हे वाचनालय बंद पडले आहे आणि याला कारणीभूत खुद्द त्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत. चारित्र्यहिन व जमिनी बळकावणाऱ्या गटाला आम्ही साथ देणार नाही.”
पत्रकार परिषदेत वासंती सावंत, गजानन खुजट, तुकाराम कुंभार, बाळू सावंत, अजय पवार, रविंद्र साळुंखे, अभिजीत माळी,अमोल सूर्यवंशी, महेश पाटील, राजू सावंत आदी उपस्थित होते.
महादेव पाटील यांनी यावेळी औपचारिक घोषणा केली…
आम्ही काँग्रेसचा पाठींबा आमदार रोहित पाटील आणि त्यांच्या पॅनेलला देत आहोत. वासंती सावंत यांना नगराध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी मी स्वतः प्रचारात उतरतो आहे.त्यामुळे तासगावच्या रणधुमाळीत रोहित पाटील गटाला मोठी ताकद मिळाली असून, निवडणूक आणखी तापण्याचे संकेत मिळत आहेत.



