तासगावात अधिवेशनानंतर आमसभा घेणार
आ. रोहित पाटील यांचे आश्वासन : जोतिराम जाधव यांचे उपोषण स्थगित

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगावात गेल्या तीन – चार दशकापासून आमसभा झाली नाही. सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यासाठी आमसभा घ्यावी, अन्यथा सोमवार दि. 3 मार्च पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी नेते जोतिराम जाधव यांनी दिला होता. दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर आमसभा घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे जाधव यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

तासगाव तालुक्यात आमसभा घेण्याबाबत आमदारांनी वेळोवेळी टाळाटाळ केली आहे. स्व. आर. आर. पाटील, माजी आमदार सुमन पाटील यांनी आमसभा घेण्याचे धाडस केले नाही. विद्यमान आमदार रोहित पाटील यांनीही आमसभा न घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पण, रोहित पाटील यांच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत. देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, अशी आशा आहे. मात्र रोहित पाटील यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी आमसभा घेण्यास टाळाटाळ केली होती.
त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी नेते जोतिराम जाधव यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. सोमवार दि. 3 मार्चपासून ते येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते. विद्यमान आमदारांकडून लोकांच्या जीवन मरणाशी निगडित असणाऱ्या समस्यांना बगल दिली जात आहे. तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. सरकारी कार्यालयात लोकांची वेळेवर कामे होत नाहीत. रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शेतीच्या समस्या, बेदाण्याची उधळण असे शेकडो प्रश्न भेडसावत आहेत, या मुद्यांवर जाधव उपोषणास बसणार होते.
दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन संपल्यानंतर आमसभा घेण्याचे लेखी आश्वासन जोतिराम जाधव यांना दिले आहे. तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी आमदारांचे लेखी आश्वासन जाधव यांना दिले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनास मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी, राज्याच्या धोरणात्मक निर्णयात चर्चा करण्यासाठी अधिवेशनास उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर आमसभा घेऊ, असे आश्वासन आमदार पाटील यांनी लेखी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जाधव यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
आमदारांनी शब्द न पाळल्यास उपोषणास बसणार : जाधव
तासगाव तालुक्यातील समस्यांबाबत आमसभा घेण्याचे आवाहन मी आमदार रोहित पाटील यांना केले होते. उपोषणाचाही इशारा दिला होता. दरम्यान, आमदारांनी अधिवेशन झाल्यानंतर आमसभा घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे माझे उपोषण स्थगित करीत आहे. मात्र आमदारांनी आमसभा घेण्याचा शब्द न पाळल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा जोतिराम जाधव यांनी दिला आहे.



