# आ.रोहित पाटीलांनी कृषिमंत्र्यांना धारेवर धरले… – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

आ.रोहित पाटीलांनी कृषिमंत्र्यांना धारेवर धरले…

कृषी धोरणासह विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर आक्षेप ; कृषी विभागामार्फत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज नेटवर्क

तासगाव – कवठेमहांकाळ तालुक्यासह राज्यातील द्राक्ष बागायती क्षेत्रांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला असून, त्यामुळे झालेल्या नुकसानाची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवामानातील अनपेक्षित बदलामुळे संपूर्ण राज्यातील द्राक्ष शेती अडचणीत आली असून, पुढील द्राक्ष हंगामावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या उत्तरावर आ. पाटील यांनी आक्षेप घेतला. आ. पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीतील प्रश्नावर कृषीमंत्री चुकीचे उत्तर देत असल्याचे म्हणत आ. पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे कृषिमंत्री कोकाटे निरुत्तर झाले. कृषी विभागाच्या उत्तरावर जोरदार आक्षेप घेत आ. रोहित पाटील यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना धारेवर धरले.

यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, द्राक्ष पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असताना, कृषि विभागाकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आणि नुकसानग्रस्त द्राक्ष पिकाच्या अभ्यासासाठी शासनाने तातडीने कृषि तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

दरम्यान, विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही त्यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. विमा कंपन्या वेळेवर नुकसान भरपाई देत नाहीत, आणि विम्यासाठी आकारली जाणारी एकरी रक्कमही शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे द्राक्ष पीक विम्याचा कालावधी १ वर्ष करावा, नुकसान भरपाई वेळी पावसाच्या पर्जन्याच्या अटी शिथिल कराव्यात आणि विम्याच्या अटींमध्ये शेतकरीहिताचे बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या विषयावर उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची तारांबळ उडाली. रोहित पाटील यांनी मिळालेल्या उत्तरावर हरकत घेत सभागृहात नाराजी व्यक्त केली. कृषिमंत्र्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिलेली उत्तरे अत्यंत जुजबी व बेजबाबदार असल्याचे म्हणत रोहित पाटील आक्रमक झाले. सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केली. शेवटी कृषिमंत्र्यांनी या मुद्द्यावर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

बोगस बेदाण्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

नेपाळ मार्गे भारतात येणाऱ्या चिनी बोगस बेदाण्यांमुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून, यावर कारवाईची आवश्यकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी देखील रोहित पाटील यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य असल्याचे नमूद करत कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

द्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण गरजेचे

द्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण तयार करणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील अनपेक्षित बदलामुळे द्राक्ष शेती तोट्यात आहे. याची मोठी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. दिवसेंदिवस द्राक्ष शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे.“जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर भविष्यात ‘द्राक्ष’च दिसेनासे होतील,” याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा असे आवाहन आ. रोहित पाटील यांनी सभागृहात केले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!