आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांना शक्ती द्या : शरद पवार
कवठेमहांकाळ येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पाटील यांच्या उमेदवारीचे दिले स्पष्ट संकेत.

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन कवठेमंहाकाळ येथे करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यातच शरद पवार यांनी आगामी विधानसभेसाठी युवा नेते रोहित पाटील यांना शक्ती द्या अशी घोषणा केली. याचबरोबर आगामी विधानसभेसाठी रोहित पाटील यांची उमेदवारीचे स्पष्ट संकेतच पवारांनी आपल्या भाषणात दिल्याची जोरदार चर्चा मेळाव्यास्थळी झाली.

आज कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर झालेल्या शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. आगामी विधानसभेच्या दृष्टीने या शेतकरी मेळाव्यास मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शेतकरी मेळाव्यात युवा नेते रोहित पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष होते. या दृष्टीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत आज देण्यात आले.



