# तासगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज द्या – रोखठोक न्युज
आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

तासगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज द्या

विजय धनवडे यांची मागणी : ताब्यात असणारे आरोपी सोडल्याचे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मांजर्डे येथील शीतल मोहिते या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणात शीतल हिचा पती, दीर, सासू व नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शीतल हिच्या पतीला अटक केली. तर इतर तिघांना सोडून दिले. हे तिघेही आता फरार आहेत. याप्रकरणी दि. 11 व 12 जुलै रोजीचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज द्यावे, अशी मागणी शीतल हिचा भाऊ विजय धनवडे यांनी केली आहे. त्यामुळे ताब्यातील आरोपीला सोडून देणे पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी : शितल हिचा विवाह मांजर्डे येथील सतीश मोहिते याच्याशी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर शितल हिला मूल होत नसल्याच्या कारणावरून मारहाण व छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून तिने आठवडाभरापूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी शितल हिचा पती सतीश, दीर सचिन, सासू सुमन व ननंद सुवर्णा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्यादिवशी हे चारही आरोपी तासगाव पोलिसांच्या ताब्यात होते. चौकशीसाठी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले होते. तक्रारदारांकडे संबंधित लोक पोलीस ठाण्यातील खोलीत बसून असल्याचे व्हिडिओ शूटिंगही उपलब्ध आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शितल तिच्या पतीला अटक केले. तर अन्य दोन महिला आरोपींना रात्रीची वेळ असल्याने सोडून दिले. शिवाय दीर सचिन याला दुसऱ्या दिवशी जबाब नोंदवून घेऊन सोडून देण्यात आले.

एकीकडे बऱ्याच गुन्ह्यातील आरोपी सापडत नाहीत, असे कारण देत पोलीस तपास लालफितीत गुंडाळून ठेवतात. मात्र दुसरीकडे एका विवाहितेने आत्महत्या केल्यानंतरही या प्रकरणातील आरोपी ताब्यात असतानाही त्यांना सोडून देण्याचे दातृत्व तासगाव पोलिसांनी दाखवले आहे. त्यामुळे तासगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे. पोलिसांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेचा भाऊ विजय धनवडे यांनी दि. 11 व 12 जुलै रोजीचे तासगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. या फुटेजमध्ये संबंधित आरोपी तासगाव पोलीस ठाण्यात आणल्याचे व त्यांना सोडून दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आरोपींना सोडून देणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, अशीही मागणी धनवडे यांनी केली आहे.

तासगाव पोलीस ठाण्यासमोर सोमवारपासून धरणे आंदोलन..!

शितल मोहिते हिच्या आत्महत्याप्रकरणी ताब्यात असणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सोडून देण्याचा आगाऊपणा केला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्या पोलिसांनी ताब्यात असलेले आरोपी सोडून दिले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी पीडितेचा भाऊ विजय धनवडे यांनी केली आहे. या मागणीसाठी उद्या (सोमवारपासून) तासगाव पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!