तासगावातील सपोनि संदीप मोरे यांना निलंबित करा
विवाहिता आत्महत्या प्रकरण : ताब्यात असणारे आरोपी सोडल्याचा ठपका : पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू

तासगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मांजर्डे येथील शीतल मोहिते या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी ताब्यात घेतले होते. मात्र केवळ एका आरोपीला अटक केली. इतरांना सोडून देण्याचा कारभार मोरे यांनी केला. याप्रकरणी ताब्यात असणारे आरोपी जाणीवपूर्वक सोडून देणाऱ्या मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शितल हिचा भाऊ गणेश धनवडे यांनी केली आहे. या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाण्यासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे.
याबाबत माहिती अशी : तासगाव येथील शितल हिचा विवाह मांजर्डे येथील सतीश मोहिते यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर शितल हिला मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. तिला मारहाण करण्यात येऊ लागली. सततच्या त्रासाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी शीतल हिचा पती सतीश, सासू सुमन, दीर सचिन व ननंद सुवर्णा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना तपास अधिकारी संदीप मोरे यांनी ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशीही करण्यात आली. मात्र चौकशीनंतर केवळ शितल हिचा पती सतीश यालाच अटक केली. तर इतर तीन आरोपींना केवळ जबाब देऊन सोडण्यात आले.
पोलिसांच्या या संशयास्पद कृतीबद्दल तक्रारदाराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आरोपी ताब्यात असतानाही त्यांना सोडून देणाऱ्या मोरे यांच्या विरोधात पीडित विवाहितेचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मयत शीतल हिचा भाऊ गणेश धनवडे यांनी वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाण्यासमोर आज पासून बेमुदत या आंदोलनात सुरुवात झाली आहे.
तासगाव पोलिसांचा निषेध असो… ताब्यात असणाऱ्या आरोपींना सोडून देणाऱ्या पोलिसांचा निषेध असो… वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशा घोषणा देत पोलीस ठाण्यासमोर आज दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. उद्या (मंगळवार) हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. आरोपींना सोडणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी धनवडे यांनी केली आहे.



