सावळजमध्ये बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण
"सिद्धकला सखी" कडून आयोजन ; महिलांचा मोठा प्रतिसाद

तासगांव : रोखठोक न्यूज
गरजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने तासगाव तालुक्यातील सावळज येथील ‘ सिद्धकला बांबू सखी गट’ या संस्थेकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दि. 18 जुलै पासून पुढील पंधरा दिवस हे प्रशिक्षण वर्ग सुरू राहील.
बांबू हस्तकला स्वयंरोजगार निर्मितीसाठी देण्यात येणा-या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या सभागृहात झाली. यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे कंदिल, राखी, पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे आदी ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार होत असून उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे, असे सामाजिक वनीकरण सांगली विभागाचे प्रशांत वरुड यांनी सांगितले.
प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन प्रमुख पाहुणे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर चे समन्वयक अजित भोसले व श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या व्हा. चेअरमन इंदुताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव निलेश रिसवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण सभ्यता संस्था वाईचे प्रवीण सोनावले यांनी महिलांना बांबू हस्तकलेचे महत्त्व, त्यापासून उपलब्ध होणा-या रोजगाराची माहिती दिली. बांबू हस्तकलेपासून तयार झालेल्या वस्तूंना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रशिक्षण वर्गातील महिलांनी उत्तम प्रशिक्षण घेऊन नवनवीन वस्तू बनवाव्यात त्याच्या विक्रीच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही प्रवीण सोनावले यांनी सांगितले.
पंधरा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाला संध्या सूर्यवंशी, अश्विनी पळसे, मयुरी पोतदार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बांबू हस्तकलेच्या मोफत प्रशिक्षण शिबिरासाठी सावळज व परिसरातून महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.



