तासगांवमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी : उत्तम दिघे
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

तासगांव,रोखठोक न्यूज नेटवर्क
२८७ तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन तयार असून तासगांव तहसील कार्यालय निवडणूकीचे मुख्यालय राहणार आहे. मतदार संघातील एकूण ३०८ मतदान केंद्रावर ३ लाख ११ हजार ३४० मतदार आपला हक्क बजावतील. आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे बजावण्यासाठी ०४ पथके नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तासगांव तहसिलदार अतुल पाटोळे व कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे उपस्थित होत्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मंगळवार, दि १५ पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यांची काटेकोरपणे सर्वांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी पत्रकार परिषदेत केले. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघासाठी तासगावं तहसील कार्यालय निवडणूकीचे मुख्यालय राहणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी दि २२ ऑक्टोबर पासून याच ठिकाणी आपले उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करावे असे सांगितले. तासगांव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३०८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रावर एकूण ३ लाख ११ हजार ३४० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १ लाख ५८ हजार ५३७ पुरुष मतदार तर १ लाख ५२ हजार ७९९ महिला मतदारांचा तसेच तृतीय पंथी ०४ मतदाराचा समावेश आहे. सदरची निवडणूक पार पाडण्यासाठी पदमभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नियोजित ठरवून दिलेल्या तारखेस प्रशिक्षण घेण्यात येईल. तसेच मतदान साहित्य वाटप स्विकारणे आणि EVM स्ट्रॉगरूम तहसिल कार्यालय तासगांव येथे प्रस्तावीत आहे तसेच मतमोजणी केंद्र बहुदद्येशीय कक्ष नवीन प्रशासकीय इमारत तासगांव येथे आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तासगावमध्ये निवडणूक तयारीचा आढावा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडून प्रशासकीय इमारतीतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान यंत्रे , स्ट्रॉंग रूम, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तयारीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी तासगाव पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपस्थित होते.



