बलगवडे ग्रामस्थांच्या लढ्याला यश; उपोषण मागे, सोलर प्रकल्पाबाबत तोडगा
माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय

तासगाव, रोखठोक न्यूज
बलगवडे (ता. तासगाव) गावातील गट क्रमांक १८० व १८१ मधील गायरान जमिनीवर वृक्षतोड करून उभारण्यात येणाऱ्या सोलर प्रकल्पाला विरोध करत ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले. माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या पुढाकाराने तहसीलदार, महावितरण अधिकारी, पोलीस प्रशासन, संबंधित सोलर कंपनीचे प्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
गावकऱ्यांनी पर्यावरण संवर्धन, गायरान जमीन संरक्षण आणि गावाच्या दीर्घकालीन हितासाठी ठाम भूमिका घेत उपोषण सुरू केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर बनत असताना माजी खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील यांनी प्रत्यक्ष बलगवडे येथे भेट देत प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात मध्यस्थी केली.
बैठकीत ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आणि संवेदनशीलपणे विचार करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी कोणतीही कृती होणार नाही, तसेच गायरान जमिनीवर होणारी वृक्षतोड थांबवण्यात येईल, अशी ठाम भूमिका यावेळी प्रशासनाकडून मांडण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बलगवडे येथील सोलर प्रकल्प कोणतीही वृक्षतोड न करता मोकळ्या व पर्यायी जागेत उभारण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धन आणि गावाच्या विकासाची सांगड घालणारा मार्ग खुला झाला आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून गावाला लाभ मिळेल, मात्र त्यासाठी निसर्गाची हानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तहसीलदार अतुल पाटोळे यांनी प्रशासनाच्या वतीने दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ग्रामस्थांचा लढा पूर्णपणे न्याय्य होता. विकास हवा, पण तो निसर्गाला नष्ट करून नाही. बलगवडेच्या लोकांनी संयम ठेवून लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली, त्याला आज यश मिळाले आहे. माजी आमदार सुमनताई पाटील यांनीही ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
या तोडग्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. गावात समाधानाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी माजी खासदार, माजी आमदार, प्रशासन व चर्चेत सहभागी सर्व घटकांचे आभार मानले. बलगवडेतील हा निर्णय पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरेल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली.



