तासगाव–कवठेमहांकाळ विकासासाठी आ. रोहित पाटील यांची आग्रही मागणी
पाणी, गटार, नाट्यगृह, आरोग्यसेवा व बाजारविकासासह प्रलंबित प्रश्नांवर भर

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार रोहित पाटील यांनी नगरविकास विभागासमोर महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. वाढत्या पाणीटंचाईचा गंभीर मुद्दा उपस्थित करत कवठेमहांकाळ शहरांसाठी मंजूर असलेली सुमारे 60 कोटींची पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. कवठेमहांकाळातील प्रभाग 4, 10, 11, 14, 15 व 16 मध्ये पाण्याची समस्या तीव्र असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.
तासगाव शहराला आवश्यक असलेल्या नव्या नाट्यगृहाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. घरकुल योजनांतील अनियमितता, भुयारी गटार योजनेतील त्रुटी, अपूर्ण कामे व अनियमित बीलांचे भुगतान यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्ट्रीटलाइट दुरुस्ती, घनकचरा संकलनासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळाची कमतरता आणि दिव्यांग अनुदानात होणारा विलंब दूर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच संरक्षक भिंती, कस्तुरबा हॉस्पिटलसाठी कर्मचारी भरती, सिद्धेश्वर मार्केटचे नवे बांधकाम व शासकीय रुग्णालयांसाठी औषध पुरवठा वाढविण्याचे प्रस्ताव त्यांनी मांडले.
या दमदार पाठपुराव्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार पाटील यांनी अधिवेशनात घेतलेली सक्रिय भूमिका विशेष ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांतून मिळत आहे.



