अभ्यासाचा ‘भोंगा’ तासगाव तालुक्यातील प्रत्येक गावात वाजायलाच हवा
शिक्षणासाठीची ही चळवळ, राजकारणाच्या पलीकडे जाण्याची वेळ आता आली आहे

तासगाव, मिलिंद पोळ
गेल्या अनेक दशकांत तासगाव तालुक्याने टोकाचे राजकारण, गटबाजी, वाद–संघर्ष यांचे चढउतार वारंवार पाहिले. नेत्यांतील मतभेदांमुळे अनेक सार्वजनिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. पण आज परिस्थिती बदलली आहे.नव्या पिढीचे भविष्य हा एकमेव प्रश्न सर्वांत मोठा ठरला आहे. त्यामुळे काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, आणि त्या पैकी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ‘अभ्यासाचा भोंगा’ उपक्रम.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगावात गेल्या तीन वर्षांपासून हा शिस्तबद्ध आणि प्रभावी उपक्रम राबविण्यात येत असून त्याचे परिणाम जिल्हाभर आशादायक ठरत आहेत. सायंकाळी 7 वाजता सायरन वाजल्यावर गावात दोन तास (9 वाजेपर्यंत) शांतता, टीव्ही–मोबाईल बंद, शिक्षकांची घरोघरी भेट, पालकांचा सहभाग आणि मुलांची अभ्यासातील नियमितता तसेच पहाटे 5 ते 7 पण हाच अभ्यासाचा उपक्रम सुरु असतो. ही दृश्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
स्वतः सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत तो जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर राबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते,एखादा चांगला उपक्रम जनचळवळ बनला तर समाजाची दिशा बदलते.
आता तासगाव तालुक्यातील गावांना हा बदल स्वीकारण्याची अनिवार्य गरज आहे.आज ग्रामीण भागातील अनेक मुले मोबाईलच्या व्यसनात अडकत आहेत, अभ्यासाचे सातत्य नाही, पालकांची चिंता वाढत आहे. स्पर्धेच्या कठीण युगात ग्रामीण मुलांनी टिकायचे असेल, तर शांत अभ्यासाचे वातावरण हे अनिवार्य आहे. म्हणूनच ‘अभ्यासाचा भोंगा’ हा उपक्रम तासगाव तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची वेळ
तालुक्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांनीही हा उपक्रम स्वतःच्या राजकीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन स्वीकारण्याची गरज आहे. संघर्ष नव्हे… सहभाग आणि सहकार्य यांची ही वेळ आहे. शिक्षणाच्या लढाईत पक्ष,गट काहीही महत्त्वाचा नसतो; महत्त्वाचे असते ते मुलांचे भविष्य.
तासगाव तालुक्यात कोणत्याही पक्षाचा नेता असो,गावोगावी हा उपक्रम कसा राबवता येईल, शिक्षक आणि ग्रामपंचायतींना कशी मदत करता येईल, पालकांना कशी प्रेरणा देता येईल यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
अभ्यासाचा भोंगा
या उपक्रमामुळे
* मुलांमध्ये नियमित अभ्यासाची सवय
* मोबाईलच्या व्यसनावर अंकुश
* पालक–शिक्षक–विद्यार्थी यांच्यात वाढती संवादसाखळी
* स्पर्धात्मक परीक्षांची तयारी अधिक सक्षम
* एकत्रित गावशिस्त आणि सामाजिक बांधिलकी
तासगाव तालुक्याची ओळख केवळ राजकीय संघर्ष नव्हे, तर शिक्षणपथदर्शी तालुका म्हणून व्हावी यासाठी ‘अभ्यासाचा भोंगा’ उपक्रम गावागावात सुरू होणे ही काळाची गरज आहे.



