सावळजसाठी ‘१०८’ची मागणी
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया–अमित कांबळे यांचा पुढाकार

तासगाव : रोखठोक न्यूज<img
तासगाव तालुक्यातील सावळज व पंचक्रोशीतील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा मोठा प्रश्न भेडसावत असून, कायमस्वरूपी ‘१०८’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आमदार रोहित पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (डी.पी.आय.)च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात सावळज व परिसरात वाहन अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, अचानक आजारपण अशा घटनांत रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेअभावी अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेकदा वाहतूक साधन मिळेपर्यंत मौल्यवान वेळ निघून जातो आणि अत्यावश्यक उपचार न मिळाल्याने जीवितहानी होण्याच्या घटना घडल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले सावळज हे गाव परिसरातील अनेक खेड्यांसाठी आरोग्य, व्यापार व दळणवळणाचे केंद्र आहे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी कायमस्वरूपी ‘१०८’ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना तात्काळ मदत मिळत नाही. त्यामुळे सावळज येथे मुक्कामी रुग्णवाहिका देणे ही काळाची गरज असल्याचे शिष्टमंडळाने ठामपणे मांडले.
या मागणीला आमदार रोहित पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सावळजसाठी कायमस्वरूपी ‘१०८’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सावळज व पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदारांच्या भूमिकेचे स्वागत केले असून, ही सेवा लवकरात लवकर सुरू झाल्यास आपत्कालीन प्रसंगी अनेकांचे प्राण वाचू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सावळजला ‘१०८’ रुग्णवाहिका मिळणे म्हणजे केवळ सुविधा नव्हे, तर परिसरातील जनतेसाठी जीवनरक्षक आधार ठरणार आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



