99 मतांचा कौल, तासगावात संजयकाकांची सत्ता कायम!
नगराध्यक्षपदी विजया पाटील यांचा थरारक विजय, आमदार गटाचा निसटता पराभव

तासगाव | मिलिंद पोळ
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. माजी खासदार संजय पाटील गटाच्या स्वाभिमानी विकास आघाडीने अवघ्या 99 मतांच्या फरकाने सत्ता काबीज करत इतिहास घडवला, तर विद्यमान आमदार रोहित पाटील गटाला निसटता पराभव स्वीकारावा लागला.
2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आज झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया बाबासो पाटील यांनी 9541 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. वासंती बाळासो सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) यांना 9442 मते मिळाली. अवघ्या 99 मतांनी ठरलेला हा कौल तासगावच्या राजकारणात मैलाचा दगड ठरला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि स्वाभिमानी विकास आघाडी असे अनेक बलाढ्य गट रिंगणात होते. मात्र अंतिम फेरीत संजय पाटील गटाने बाजी मारली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार सभा घेऊनही भाजपला मोठा धक्का बसला. नगराध्यक्ष पदासह भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. तसेच ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पत्नीची उमेदवारी घेतल्याने आमदार गटाला फटका बसला आणि हा पराभव निर्णायक ठरल्याचे जाणकारांचे मत आहे.
प्रभागनिहाय निकाल (विजयी उमेदवार व मते)
प्रभाग 1: मधुकर दत्तात्रय पाटील (स्वा. आघाडी) – 865, जयश्री विकास कोकळे (स्वा. आघाडी) – 782
प्रभाग 2: रोहिणी विनोद धोत्रे (स्वा. आघाडी) – 801, अरुण प्रकाश साळुंखे (रा. काँग्रेस श. प.) – 788
प्रभाग 3: पुनम सचिन माळी – 1088, अभिषेक संजय देशिंगकर – 1100 (रा. काँग्रेस श. प.)
प्रभाग 4: रामचंद्र वसंतराव माळी – 1024, शोभा दीपक जाधव – 1015 (रा. काँग्रेस श. प.)
प्रभाग 5: अनिल गुंडाप्पा कुत्ते (स्वा. आघाडी) – 884, ज्योती सचिन कोळी (रा. काँग्रेस श. प.) – 908
प्रभाग 6: अमृता संपत माळी – 1391, अहमदसो आजमुद्दीन मुजावर – 1108 (रा. काँग्रेस श. प.)
प्रभाग 7: प्रसाद भारत पैलवान – 1182, अर्चना रमेश शिंदे – 1206 (स्वा. आघाडी)
प्रभाग 8: संतोष पांडुरंग बेले (स्वा. आघाडी) – 820, सुशीला संजय जाधव (रा. काँग्रेस श. प.) – 853
प्रभाग 9: सचिन मारुती भाट – 1221, भारती अशोक धाबगुडे – 1337 (स्वा. आघाडी)
प्रभाग 10: सतीश किसन लिंबळे – 1104, संध्या संजय लुगडे – 1089 (स्वा. आघाडी)
प्रभाग 11: सचिन वसंत कांबळे (रा. काँग्रेस श. प.) – 812, दिपाली दिग्विजय पाटील (स्वा. आघाडी) – 1102
प्रभाग 12: उषा बाबासाहेब कांबळे (रा. काँग्रेस श. प.) – 865, रोहन मोहन कांबळे (स्वा. आघाडी) – 872
पक्षीय बलाबल
स्वाभिमानी विकास आघाडी – 13 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 11 जागा
नगराध्यक्ष – स्वाभिमानी विकास आघाडी (माजी खासदार संजय पाटील गट)
जल्लोष आणि राजकीय पडसाद
निकाल जाहीर होताच शहरात जल्लोष उसळला. गुलालाची उधळण, फटाके आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर मिळालेल्या या विजयामुळे संजय पाटील गट पुन्हा ‘रिचार्ज’ झाल्याचे चित्र आहे.
अवघ्या 99 मतांनी ठरलेल्या या अटीतटीच्या लढतीचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकणार असून, तासगावचा हा कौल जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.



