धनशक्तीपुढे भाजपचे अपयश; तरीही तासगाव–कवठेमहांकाळात संघटन बळकट करण्याचा निर्धार : स्वप्निल पाटील
विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण; अपयशातून धडा घेत नव्या जोमाने तयारी

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर उतरलेल्या भारतीय जनता पार्टीला धनशक्तीच्या जोरापुढे अपयश स्वीकारावे लागले. दोन्ही पारंपरिक गटांनी केलेल्या प्रचंड पैशाच्या वापरामुळेच हा निकाल लागला असल्याचे ठामपणे सांगत, तरीही यापुढील काळात तासगाव शहरासह तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यात भाजप अधिक मजबूत करून विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी दिली.
तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कवठेमहांकाळचे तालुका अध्यक्ष उदय भोसले, प्रशांत कुलकर्णी, सागर धाबुगडे, पक्ष निरीक्षक अनिल लोंढे, विकास धनवडे, सुरज गावडे, विजय कांबळे, अरुण निकम, उत्तम सावंत, इरफान सय्यद, अमित पवार तसेच नगरपालिका निवडणूक लढवलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
स्वप्निल पाटील म्हणाले, “तासगाव नगरपालिकेत आजवर दोनच पारंपरिक गटांचे वर्चस्व राहिले आहे. अशा परिस्थितीत भाजपने प्रथमच संपूर्ण पॅनल उभा करून पर्यायी ताकद निर्माण केली. सर्वसामान्य घरातील, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देत आम्ही विकासाची व्हिजन जनतेसमोर ठेवली. मात्र या पर्यायामुळे घाबरलेल्या गटांनी धनशक्तीचा अमर्याद वापर केला आणि त्यापुढे आमचे अपयश झाले.”
निवडणूक काळात उमेदवारांवर मोठा दबाव आणला गेला, तरीही कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सक्षमपणे लढत दिली, असे सांगून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही भाजपसोबत ठाम राहिलेल्या नागरिकांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले, “देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तासगावच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळू. तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता फक्त भाजपकडे आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा आमचा निर्धार आहे.”
“कुठलेही यश आणि अपयश अंतिम नसते. जे घडले त्यातून अनुभव घेत आगामी निवडणुकांसाठी तयारी करणार असून तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांत संघटन वाढवण्यासाठी प्रभावी प्रयत्न करू,” असेही स्वप्निल पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी सागर धाबुगडे यांनी तासगावकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत, आगामी काळात तळागाळापासून संघटना मजबूत करून भाजपची मांडणी अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त केला.



