शुक्रवारी खा.सुप्रिया सुळे सावळजमध्ये
स्व. चंद्रकांत पाटील अर्धपुतळा अनावरण सोहळा ; मान्यवरांची उपस्थिती

तासगांव : रोखठोक न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीचे दिवंगत जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांच्या अर्ध पुतळा अनावरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे शुक्रवारी (दि.13) सावळज (ता. तासगांव) येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती मा.जि.प. सदस्य सागर पाटील यांनी दिली.
सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत बापू पाटील यांचे जून 2019 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. शिवाजी क्रीडा मंडळ व श्री सिद्धेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांचा सावळज व परिसरात मोठा जनसंपर्क होता. सावळज गावचे सरपंच म्हणून चंद्रकांत पाटील यांचा राजकीय श्री गणेशा झाला होता. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी आपला राजकीय आलेख चढता ठेवला होता.
2007 व 2012 मध्ये पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून त्यांनी कारभार पाहिला. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते सदस्य म्हणून निवडून आले होते. मुंबई येथे पक्षाच्या बैठकीसाठी जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री सिद्धेश्वर पतसंस्थेच्या प्रांगणात स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांचा अर्ध पुतळा बसविण्यात आला आहे.

याच पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. सुमन पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, रोहित पाटील, सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.



