लोकसभेनंतरच बहिणी लाडक्या झाल्या: खा.सुप्रिया सुळे
सावळजमध्ये स्व. चंद्रकांत पाटील पुतळ्याचे अनावरण, खा. विशाल पाटील व आ.जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी

तासगाव, रोखठोक न्यूज नेटवर्क
निवडणुकां आधी बहिणींना दिलेली आश्वासने तुम्ही पाळली नाहीत मात्र लोकसभा निवडणुक निकलानंतर बहिणी लाडक्या झाल्या. पंधराशे रुपयात प्रेम मिळत नाही, नात्यात श्रेयवाद करुन मते मिळवू नका असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या तासगाव तालुक्यातील सावळज येथे स्वर्गीय चंद्रकांत बापू पाटील यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होत्या. यावेळी खासदार विशाल पाटील व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शाब्दिक जुगलबंदी पहायला मिळाली.
यावेळी आमदार सुमनताई पाटील, युवक नेते रोहित पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सुरेश पाटील, माधवराव पोळ, अनिता सगरे, ताजुद्दीन तांबोळी, संजय पाटील, दिलीप ऊनऊने, रवी पाटील, विश्वास पाटील, सभापती युवराज पाटील, बंडू पवार, दीपक ऊनऊने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सागर पाटील यांनी केले होते.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की पवार कुटुंब व सांगली जिल्हा यांचे सहा दशकांचे नाते आहे. संघर्षाच्या काळात हा जिल्हा कायम आमच्या मागे उभा राहिला. मात्र आता आबानंतर रोहित हा चेहरा आशादायी आहे. आबांनी आपल्या कर्तुत्वाच्या जीवावर गृहमंत्री म्हणून राज्यात नाव कमावले. विविध प्रश्न सोडवले. पक्ष संघटना मजबूत केली. राज्याचा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आबांचे नाव सुवर्णअक्षरात लिहिले जाईल असे त्यांनी सांगितले.
नेतृत्व हे संघर्षातूनच उभे राहते. पक्ष गेला, चिन्ह गेलं मात्र लोकांनी निर्णय घेत लोकसभेची निवडणूक हातात घेतली. मी कोर्टाची कधी पायरी चढली नाही मात्र या लढाईसाठी ती चढावी लागली. प्रत्येक गावातील घर व त्यांचे प्रश्न आपल्याला माहिती पाहिजेत. विकास कामासाठी आम्हाला पैसे दिले जात नाहीत मात्र दोन महिन्यात आपले सरकार येणार आहे सत्तेत आल्यावर आपण विरोधकांचीही कामे करू असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, की रोहित कमी वयात प्रगल्भ झालाय. अंजनीकर पद्माळे करांच्या मदतीला येतात. स्वर्गीय चंदू बापू अनपेक्षित पणे गेले. मात्र सागरने संस्था व माणसाना सांभाळले आहे.सावळज गावचे राजकारण सोपं नाही मात्र प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी या गावाने व्यवस्थित पार पाडली. सागरने समर्थपणे वारसा चालवला. बापूंचा पुतळा आपल्याला प्रेरणा देईल असे त्यांनी सांगितले.
शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणले की आबांचे जवळचे नेते म्हणून बापूंकडे पाहिले जाते. चिकाटी व एका एका मताची कदर करणारा नेता व पूर्ण मतदारसंघ माहित असलेला परिपक्व माणूस, लोकांशी प्रचंड एकनिष्ठ होता. त्यांच्या जाण्याने नुकसान झालं मात्र येथील लोक सागरला पाठबळ देतील. गडचिरोली तील लोकांच्या मागणीनुसार निवडणुकीनंतर सहाच महिन्यात आबांचा पुतळा तिथे उभा करायचा आहे. राजकारणासाठी शरीराकडे बापूंनी खुप दुर्लक्ष केले. त्यांनी काम केलेले स्मरणात राहावं यासाठी हा पुतळा उभारला असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, सावळजला अनेक निवडणुका झाल्या, पण या लोकांनी कधी प्रचारासाठी आम्हाला येऊ दिले नाही. आबांना घडवायला येथील लोकांनी घाम नाही तर रक्त सांडले आहे. बापू हे आबांचे बिनीचे कार्यकर्ते होते. या गावाने आम्हाला सांभळले. स्वर्गीय बापूंनी पतसंस्था उभारून लोकांना पत मिळवून दिली व अनेक लोक घडवले. सागर पाटीलही बापूंची भूमिका पार पडत असून आबांचे घर वाचले पाहिजे यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. राज्यातला पहिला आमदार हा महाविकास आघाडीचा तासगाव मधून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविकात बोलताना जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी स्वर्गीय चंद्रकांत बापू यांचा जीवनपट सांगितला. त्यांचे लोकांशी असणारे नाते, विकास कामे, पतसंस्थेच्या माध्यमातून उभारलेले संसार यांसह विविध गोष्टींची आठवण त्यांनी करून देत रोहित पाटील यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू असे यावेळी त्यांनी सांगितले.
साहेब प्रेमाने दिल्लीला पाठवले :विशाल पाटील
या कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोपरखळ्या मारल्या. जयंत पाटील साहेबांनी मला खूप प्रेमाने दिल्लीला पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
रोहितदादा आमदार होणार:खा.विशाल पाटील
विशाल पाटील म्हणाले की या मतदारसंघात तुमच्या पक्षाचा आमदार निवडून द्यायचा आहे. रोहित दादांच्या मागे वसंतदादा कुटुंबीय उभे राहणार असून तुम्ही टेन्शन घेऊ नका. राजकारण त्या त्या ठिकाणी चालत राहणार मात्र या मतदारसंघात रोहितच्या रूपाने आपला माणूस आमदार होईल याची सर्वांनी जबाबदारी घ्या असे सांगितले.
रोहित व विरोधकांमध्ये फार अंतर: आ.जयंत पाटील
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की महाराष्ट्राच्या बदलत्या वातावरणाचा सध्या अनुभव येत आहे. रोहित हा राज्यातला पहिला आमदार आलाच पाहिजे आणि तो डोळे झाकून येईल. तुम्ही व विरोधक यांच्यात फार अंतर आहे असे ते म्हणाले.
खुणवा-खुणवी:
कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल नुसार खा.सुप्रिया सुळे नंतर आ.जयंत पाटील यांचा सत्कार होणार होता. मात्र, व्यासपीठावर विद्यमान खासदार विशाल दादा पाटील उपस्थित असल्याने जिल्हास्तरावरील प्रोटोकॉल पाळण्यासाठी आ.जयंत पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये भुवया उंचावून प्रथम खा. विशाल पाटील यांचा सत्कार करा असे आयोजकांना भुवया उंचावून खुणवा-खुणव केली. नेमके यावेळी उपस्थितांचे लक्ष जयंत पाटील व विशाल पाटील यांच्या कडेच होते. आणि एकच हास्यकल्लोळ झाला.



