# आटपाडी आगाराच्या वाहकाचा मुजोरपणा – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

आटपाडी आगाराच्या वाहकाचा मुजोरपणा

उपाशीपोटी थांबलेल्या विद्यार्थिनींना बसमध्ये घेण्यास नकार : वायफळे बस स्टँडवरील प्रकार

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : प्रतिनिधी

आटपाडी आगाराच्या ‘आटपाडी – इचलकरंजी’ (बस क्र. एम. एच. 20 बी. एल 1369) या बसच्या वाहकाचा मुजोरपणा चव्हाट्यावर आला आहे. वायफळे (ता. तासगाव) येथील स्टँडवर उपाशीपोटी बसची वाट पाहणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थीनींसाठी या वाहकाने थांबवलेली बस पुढे न्यायला लावली. बसमध्ये उभे राहायला जागा असतानाही डी. बी. नवले या वाहकाने चालकाला बस थांबवू दिली नाही. याप्रकरणी नवले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बिरणवाडी (ता. तासगाव) येथील अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनी वायफळे येथील बाळासाहेब देसाई हायस्कूल या शाळेत शिक्षण घेतात. आज शनिवार असल्याने या विद्यार्थिनी सकाळी लवकर शाळेला आल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनी वायफळे येथील बस स्टॉपवर बिरणवाडी या आपल्या गावी जाण्यासाठी थांबल्या होत्या. सकाळपासून या विद्यार्थिनी उपाशी होत्या. या विद्यार्थिनींना आटपाडी आगाराच्या बस शिवाय दुसरी कोणतीही बस नाही. त्यामुळे बसची वाट पाहत या विद्यार्थिनी स्टँडवर उभ्या होत्या.

आटपाडी आगाराची ‘आटपाडी इचलकरंजी’ (बस क्र. एम. एच. 20 बी. एल 1369) ही बस सकाळी सव्वा अकरा वाजता वायफळे येथील स्टॉपवर आली. या स्टॉप वर बिरणवाडी येथील 15 ते 20 विद्यार्थिनी सोबतच अन्य काही प्रवासी व तासगावला महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी उभे होते.

विद्यार्थ्यांना पाहून चालकाने बस थांबवली. त्यावेळी बसमध्ये अवघे पाच ते सहा प्रवासी उभे होते. त्यामुळे वायफळे स्टॉपवर उभे असणारे सर्व विद्यार्थी व अन्य प्रवासी या बस मध्ये सहज बसू शकत होते. मात्र चालकाने थांबवलेली बस वाहक डी. बी. नवले यांनी हलवायला लावली. बसमध्ये जागा असतानाही या वाहकाने थांबलेली बस तासगावच्या दिशेने नेण्याची सूचना चालकाला केली.

नवले यांचा हा मस्तवालपणा संतापजनक आहे. बिरणवाडी येथील या विद्यार्थिनी सकाळी लवकर शाळेला आलेल्या असतात. त्या उपाशीपोटी आलेल्या असतात. शाळा सुटल्यानंतर कधी एकदा घरी जाईल, असे या विद्यार्थिनींना झालेले असते. दरम्यान, आटपाडी आगाराची एक बस चुकली की नंतर अर्धा ते पाऊण तासाचा फरक पडतो. त्यामुळे विद्यार्थिनींना आलेल्या बसने घरी जाणे गरजेचे असते.

मात्र बसमध्ये जागा असतानाही नवले यांच्या मस्तवालपणामुळे आज विद्यार्थिनींना बसमध्ये घेतले गेले नाही. या प्रकारामुळे विद्यार्थिनीसह पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याप्रकरणी आटपाडी आगाराचे व्यवस्थापक राहुल देशमुख, सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्याकडे सोशल मीडिया द्वारे तक्रार करण्यात आली आहे.

मस्तवाल वाहक डी. बी. नवले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालकांनी केली आहे. नवले यांच्यावर कारवाई न झाल्यास वायफळे येथे आटपाडी आगाराच्या बस अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!