दिव्यांग व बालगृह विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारली ‘सुजाण दिवाळी’
सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वस्तू विक्रीतून एक लाखांहून अधिक उत्पन्न

सांगली : रोखठोक न्यूज
“माझी सांगली माझा अभियान” अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिव्यांग व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळी सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर भरवण्यात आले. खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनात जिल्ह्यातील 24 संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवसभरात विविध शोभेच्या व सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीतून तब्बल 1 लाख 2 हजार 757 रुपये जमा झाले. सांगलीकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन मुलांना प्रोत्साहन दिले.
“या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे आणि सुजाण नागरिक बनण्याचे प्रशिक्षण मिळत आहे. हेच ‘सांगली व्हिजन 2030’ साकारण्याचे पाऊल आहे,” असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीकरांचे आभार मानताना सांगितले.
या वेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तहसीलदार अमोल कुंभार, लिना खरात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.



