उमेदवारी नाकारताच रोष उसळला; तासगावात समीकरणे पालटली
माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश ; अमोल शिंदेही बंडखोर भूमिकेत

तासगाव, मिलिंद पोळ
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट)मध्ये एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीने मोठा विस्फोट झाला आहे. आर. आर. पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीला नकार मिळाल्यानंतर संतापाने शरद पवार गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला.
अजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत आमदार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. “गेली ३० वर्षे आर. आर. पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलो. अर्ज भरा असे सांगून शेवटच्या क्षणी थांबा असा आदेश देण्यात आला. निष्ठेपेक्षा ५०–६० लाख खर्च करणारा पैसेवाला उमेदवारच हवा होता,” असा घणाघात त्यांनी केला. बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचेही दिसले.
तासगाव नगरपालिकेची निवडणूक तापत असतानाच एबी फॉर्ममधील या निर्णयाने शहरातील राजकारणात खळबळ उडाली. संतप्त अजय पाटील यांनी तत्काळ अजितदादा पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आपल्या पत्नी सौ. जोती पाटील यांच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्याची घोषणा केली.
“दोन्ही गटांनी दिलेले उमेदवार अयोग्य असून शहराच्या विकासासाठी काहीही करू शकत नाहीत. तासगावच्या परिवर्तनासाठीच मी उमेदवारी मागितली होती,” अशी टीका करत त्यांनी शहरवासीयांना आपल्या गटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
अजय पाटील यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापनाना पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशामुळे तासगावमधील निवडणूक समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रोहित पाटील गटाला मोठा धक्का; दोन माजी नगराध्यक्षांची बंडखोरी
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार रोहित पाटील गटाला मोठा सुरुंग लागला आहे. नगराध्यक्ष पदासाठी पत्नींच्या उमेदवारीला शेवटच्या क्षणी नकार मिळाल्याने माजी नगराध्यक्ष अजय पाटील आणि अमोल शिंदे संतप्त झाले. अजय पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून पत्नीची उमेदवारी निश्चित केली, तर अमोल शिंदे यांनी पत्नीचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.दोन्ही निष्ठावंत नेत्यांच्या बंडखोरीने गटात असंतोष उसळला असून निवडणुकीचे समीकरण पूर्ण बदलले आहे.



