
तासगांव, मिलिंद पोळ
9890710999
२००९ साली तासगाव तालुक्यातील ४८ गावे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ६१ गावांचा मिळून तासगाव-कवठेमहांकाळ असा मतदारसंघ निर्माण झाला आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून मतदारसंघातील तासगाव तालुक्यात स्व. दिनकर पाटील आणि स्व. आर.आर.आबा पाटील या दोन घराण्यांमध्ये अत्यंत टोकाचा असा राजकीय संघर्ष पहायला मिळाला आहे. आता मतदारसंघाचा भाग असलेल्या पुर्वीच्या कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरुवातीस विठ्ठल दाजी पाटील विरुद्ध अजितराव घोरपडे आणि नंतर शिवाजीराव शेंडगे विरुध्द अजितराव घोरपडे असा राजकीय संघर्ष पहायला मिळाला आहे. या निवडणूकीत सुध्दा स्व. दिनकर आबा पाटील यांचे राजकीय वारसदार माजी खासदार संजय पाटील आणि स्व.आर.आर.आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित आर.आर.पाटील आमने – सामने उभे ठाकलेले आहेत. ही लढत राज्यातील एक लक्षवेधी अशी लढत होणार आहे.
सन १९५२ सालापासून तासगाव मतदारसंघ अस्तित्वात होता. मतदारसंघात १९५२ ते १९६७ या काळात दत्ताजीराव सुर्यवंशी, जी.डी. बापू लाड आणि धोंडिराम पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी आमदार म्हणून काम पाहिले. तर १९६७ ते १९७८ या कालावधीत येळावी येथील बाबासाहेब पाटील हे सलग दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते. १९७८ ते १९९० या कालावधीत चिंचणी येथील दिनकर आबा पाटील हे एकवेळेस काँग्रेसच्या तिकीटावर तर सलग दोन वेळेस अपक्ष असे तीनवेळा आमदार झाले.
१९९० साली तासगाव मतदारसंघामध्ये आर. आर. पाटील पर्वाचा आणि दिनकर आबा विरुद्ध आर.आर.आबा या टोकाच्या राजकीय संघर्षाचा उदय झाला. १९९० साली काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहून अपक्ष डी. एम. पाटील यांचा पराभव करणा-या आर.आर.पाटील यांनी १९९५ साली काँग्रेस मधूनच निवडणूक लढवत अपक्ष उमेदवार दिनकर आबा पाटील यांना पराभवाची धूळ चारली.
१९९९ साली शरद पवार यांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यावेळी आर.आर पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार दिनकर आबा पाटील यांचे पुतणे संजय पाटील यांचा सांगलीतून तासगाव मतदारसंघाच्या राजकारणात प्रवेश झाला. १९९९ च्या निवडणुकीत संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांना जेरीस आणले. या निवडणुकीत आर. आर. पाटील यांचा ३ हजार ४९७ मतांनी निसटता विजय झाला.
१९९९ च्या विजयानंतर आर. आर. पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. २००४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांच्यावर गृहमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत आर.आर.पाटील हे पुन्हा एकदा ६ हजार ३०४ अशा काठावरील मताधिक्याने निवडून आले. आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पेक्षा कमी जागा लढवून जास्त जागा जिंकण्याची किमया केली. याचे बक्षिस म्हणून शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवले.
२००९ साली तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांचा मिळून तासगाव-कवठेमहांकाळ असा मतदारसंघ तयार झाला. दरम्यानच्या काळामध्ये संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याशी समझोता करुन विधानपरिषद पदरात पाडून घेतली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात अपक्ष दंड ठोठावत तगडे आव्हान उभे केले, परंतू तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील आणि आमदार संजय पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करत घोरपडे यांना माघार घ्यायला लावून आव्हान मोडीत काढले होते. शिवसेनेच्या दिनकर पाटील यांच्या विरोधातील ही निवडणूक आर. आर. पाटील ६५ हजार १७३ मताधिक्याने जिंकले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी संजय पाटील भारतीय जनता पक्षात जाऊन खासदार झाले. अजितराव घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आर. आर. पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आर. आर. पाटील यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथे सभा घेतली. परंतू याचा भारतीय जनता पक्षाला याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. देशाचे पंतप्रधान आर. आर. पाटील यांचा पराभव करण्यासाठी तासगाव येथे येऊन सभा घेतात, याची सहानुभूती आर. आर. पाटील यांना मिळाली. २२ हजार ४१० मताधिक्याने अजितराव घोरपडे यांचा पराभव झाला.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कर्करोगाने आर. आर. पाटील यांचे निधन झाले. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांनी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांना बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला, परंतू सावर्डे येथील स्वप्निल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवल्याने निवडणूक लागली. निवडणुकीत सुमनताई पाटील यांनी स्वप्निल पाटील यांचा एक लाख १२ हजार ९६३ मताधिक्याने पराभव केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. अजितराव घोरपडे यांनी शिवबंधन बांधून सुमनताई पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. निवडणुकीत अजितराव घोरपडे यांना तब्बल ६२ हजार ५३२ एवढ्या मोठ्या मताधिक्याने दारुण असा पराभव स्विकारावा लागला.
आटपाडी – कवठेमहांकाळ मतदारसंघाचा इतिहास
१९६५ साली आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यांची निर्मिती झालेनंतर १९६७ साली नवा आटपाडी – कवठेमहांकाळ असा मतदारसंघ निर्माण झाला होता. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत आटपाडी – कवठेमहांकाळ मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या बी. एस. कोरे यांनी ३३ हजार ४०४ मते मिळवत ५ हजार ८७५ मते मिळविणा-या आर. आर. देशमुख यांच्यावर २७ हजार ५२९ मताधिक्याने विजय मिळवला. तर १९६७ च्या निवडणूकीमध्ये काँग्रेसच्या आण्णासाहेब लेंगरे यांनी ५१ हजार ८९१ मते घेत ५ हजार ७०४ मते घेणा-या एच.एन.खुजट यांचा ४६ हजार १८७ मतांनी पराभव केला होता.
कवठेमहांकाळ मतदारसंघाचा इतिहास
१९७८ सालापासून ते २००४ पर्यंत मिरज तालुक्याच्या पुर्व भागातील २९ गावांचा समावेश असलेला कवठेमहांकाळ मतदारसंघ होता. १९७८ ते १९९० या १२ वर्षाच्या कालावधीत काँग्रेसचे विठ्ठल दाजी पाटील सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आले. १९९० ला काँग्रेसचे शिवाजीराव शेंडगे यांनी अपक्ष अजितराव घोरपडे यांचा पराभव केला. यावेळी शिवाजीराव शेंडगे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली होती. परंतू १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष अजितराव घोरपडे यांनी त्यांचा पराभव केला होता. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अजितराव घोरपडे यांनी शिवाजीराव शेंडगे यांचा पराभव केला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे जयसिंगराव शेंडगे यांनी अजितराव घोरपडे यांच्या विरोधात अपक्ष दंड थोपटले होते. २००४ च्या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी जयसिंगराव शेंडगे यांचा पराभव करून आमदारकीची हॅट्रिक केली.




